हिंदूंनी चार मुलांना जन्म दिला पाहिजे - साक्षी महाराज
By Admin | Updated: January 7, 2015 12:49 IST2015-01-07T10:53:33+5:302015-01-07T12:49:23+5:30
हिंदू धर्माचे रक्षण करायचे असेल तर देशातील प्रत्येक हिंदू महिलेने किमान चार मुलांना जन्म दिला पाहिजे अशी मुक्ताफळे उधळत भाजपा खासदार साक्षी महाराज नव्या वादाला तोंड फोडले आहे.

हिंदूंनी चार मुलांना जन्म दिला पाहिजे - साक्षी महाराज
>ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. ७ - नेत्यांनी लक्ष्मणरेषा ओलांडू नये असा इशारा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला असतानाही भाजपा नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये अद्याप सुरूच आहेत. ' देशातील प्रत्येक हिंदू महिलेने किमान चार मुलांना जन्म दिला पाहिजे' असा सल्ला देत भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.
मेरठमधील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी हम दो हमारा एका हा नारा बेकार असल्याचे सांगितले. ' भारतात आता चार बायका आणि ४० मुले ही संकल्पना चालणार नाही. हिंदू धर्माचे रक्षण करायचे असेल तर प्रत्येक हिंदू महिलेने कमीतकमी चार मुलांना जन्म दिला पाहिजे,' असे ते म्हणाले.
याच साक्षी महाराजांनी यापूर्वी नथुराम गोडसे यांना राष्ट्रभक्त म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. भाजपा नेत्यांच्या वक्तव्यांमुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरत संसदेचे कामकाजही अनेक ठप्प पाडले होते. त्यानंतर पंतप्रधानांनी सर्व नेत्यांना वादग्रस्त वक्तव्ये न करण्याची तसेच आपले काम चोखपणे करण्याची ताकीद दिली होती. मात्र त्यानंतरही भाजप नेत्यांनी मुक्ताफळे उधळणे सुरूच ठेवले आहे.