JNU चे नाव बदला अन् वीर सावरकर विद्यापीठ ठेवा; हिंदू महासभेची मोदी सरकारकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 16:17 IST2022-04-11T16:15:24+5:302022-04-11T16:17:10+5:30
राम नवमीनिमित्ताने आयोजित हवन-पूजन कार्यक्रमावरून जेएनयूमध्ये तणावर निर्माण झाला होता.

JNU चे नाव बदला अन् वीर सावरकर विद्यापीठ ठेवा; हिंदू महासभेची मोदी सरकारकडे मागणी
नवी दिल्ली: अनेकविध कारणांमुळे दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ कायम चर्चेत असते. अलीकडेच जेएनयू विद्यापाठीत डावा गट आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये झटापट झाल्याची घटना ताजी असतानाच आता हिंदू महासभेने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने नाव बदलण्याची मागणी केली आहे. या विद्यापीठाचे नाव वीर सावरकर करावे, या मागणीचे पत्र हिंदू महासभेने मोदी सरकारला लिहिले आहे.
हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांना पत्र लिहिले आहे. राम नवमीच्या दिवशी कावेरी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या हवन-पूजनामध्ये लेफ्ट विंगच्या विद्यार्थ्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एबीवीपीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. यामुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
JNU चे नाव बदला अन् वीर सावरकर विद्यापीठ ठेवा
केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील काही फुटीरतावादी आणि तुकडे टुकडे गँग देशद्रोही घटकांशी संगनमत करून पाकिस्तानच्या इशार्यावर देशाच्या विरोधात घोषणाबाजी करतात आणि देशाचे तुकडे करण्याची भाषा करतातस असे निदर्शनास येते. हिंदूंच्या देवी-देवतांचा अपमान केला जातो, तर आपल्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते वीर सावरकरांचा अपमान केला जातो. यामुळे जवाहरलाल विद्यापीठाचे नाव बदलून वीर सावरकर विद्यापीठ करावे. तसेच बाबरी मशिदीच्या समर्थनार्थ नारेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, जेएनयू विद्यार्थी संघटनेने दावा केला आहे की, एबीवीपीचे विद्यार्थी द्वेषाचे राजकारण करत कावेरी हॉस्टेलमधील वातावरण बिघडवले जात आहे. यासाठी ते हिंसाचार करत आहेत. तसेच एबीवीपीच्या विद्यार्थ्यांनी मेस कमिटीला जेवणात बदल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही विद्यार्थी संघटनेने केला आहे.