Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 11:43 IST2025-08-14T11:39:51+5:302025-08-14T11:43:11+5:30

हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील ऋषी डोंगरी खोऱ्यात ढगफुटी झाल्यामुळे होजिस लुंगपा नाल्याला अचानक पूर आला.

Himachal Pradesh Cloudburst: Rain wreaks havoc in Himachal, cloudburst in Kinnaur; Houses and cars washed away, 325 roads closed | Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद

Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद

हिमाचल प्रदेशात निसर्गाचा प्रकोप सुरू आहे. राज्यातील किन्नौर जिल्ह्यातील ऋषी डोंगरी खोऱ्यात ढगफुटी झाल्यामुळे होजिस लुंगपा नाल्याला अचानक पूर आला. यादरम्यान सतलज नदीच्या दुसऱ्या बाजूला ४ लोक अडकले आणि एक जण जखमी झाला. तर, सीपीडब्ल्यूडी कॅम्पही पुरात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच, ट्रिपिक्स ब्रिगेडची बचाव पथके रात्रीच्या अंधारातून, पाण्याच्या जोरदार प्रवाहातून आणि कठीण मार्गांमधून अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचले.

लोकांना रात्रभर सुरक्षित राहता यावे म्हणून पथकाने अन्न, पाणी आणि इतर आवश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी एका विशेष हाय अल्टिट्यूड ड्रोनचा (LDHA) वापर केला. तसेच, जखमी व्यक्तीला वाचवण्यात आले आणि ताबडतोब रेकाँग पेओ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रशासन सतर्क!
हिमाचलमध्ये ढगफुटी आणि अचानक आलेल्या पुराच्या घटनांनंतर प्रशासन सतत सतर्क आहे. या घटनांमुळे शिमला, लाहौल आणि स्पिती जिल्ह्यात अनेक पूल पाण्यात वाहून गेले आहेत, तर ३०० हून अधिक रस्ते सध्या बंद करण्यात आले आहेत. गणवी खोऱ्यात अलिकडेच आलेल्या पुरामुळे एक पोलीस चौकी वाहून गेली आहे. तर, शिमलामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक दुकानांचे नुकसान झाले आहे. या घटनांमध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.

आपत्तींमुळे ३२५ रस्ते बंद
राज्यातील आदिवासी लाहौल आणि स्पिती जिल्ह्यातील मायाड खोऱ्यातील करपट येथे ढगफुटी झाल्यानंतर चांगुट आणि उडगोस नाल्यांमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे दोन पूल वाहून गेले. अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्याने लोक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. या आपत्तींमुळे अनेक एकर शेती जमीन नष्ट झाली आहे.

प्रशासन सतत मदत आणि बचाव कार्यात गुंतलेले आहे. राज्यातील आपत्तींमुळे दोन राष्ट्रीय महामार्गांसह ३२५ रस्ते बंद करण्यात आले आहेत. राज्य आपत्कालीन ऑपरेशन सेंटर (SEOC) नुसार, यापैकी १७९ रस्ते मंडी जिल्ह्यात आणि ७१ रस्ते लगतच्या कुल्लू जिल्ह्यात आहेत.

या जिल्ह्यांसाठी अलर्ट
गुरुवारी, हवामान खात्याने राज्यातील चार जिल्ह्यांसाठी - कांगडा, मंडी, शिमला, सिरमौर - ऑरेंज अलर्ट जारी केला आहे आणि इतर चार जिल्ह्यांसाठी - सोलन, उना, कुल्लू, चंबा - मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. येत्या काही दिवसांतही राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने लोकांना नद्या आणि नाल्यांपासून दूर राहण्याचे आणि अत्यंत आवश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Himachal Pradesh Cloudburst: Rain wreaks havoc in Himachal, cloudburst in Kinnaur; Houses and cars washed away, 325 roads closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.