हिमाचलमध्ये हाहाकार; दोन महिन्यांत 327 मृत्यू, 113 भूस्खलन अन् 58 महापूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 14:13 IST2023-08-17T14:13:07+5:302023-08-17T14:13:50+5:30
Himachal Disaster: गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यभर बिकट परिस्थिती झाली आहे.

हिमाचलमध्ये हाहाकार; दोन महिन्यांत 327 मृत्यू, 113 भूस्खलन अन् 58 महापूर
Himachal Pradesh Disaster : यंदाचा पावसाळा उत्तरेकडील काही राज्यांसाठी काळरात्र बनून आलाय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हिमाचलमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे आतापर्यंत 327 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 320 हून अधिक जखमी झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 113 भूस्खलन आणि 58 फ्लॅश फ्लड घटनांची नोंद झाली आहे. 41 वर्षांनंतर राज्यात एवढी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
हिमाचल प्रदेशच्या कांगडामध्ये 17 ऑगस्टलाही मुसळधार पाऊस झाला. स्थानिक प्रशासनाने सकाळी साडेसातपासून बचावकार्य सुरू केले. स्थानिक लोकांच्या मदतीने प्रशासनाने रेशन किटचे वाटप केले. 16 ऑगस्ट रोजीही अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली. यादरम्यान प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर बचाव मोहिम राबवण्यात आली.
प्रशासनाने आतापर्यंत 1 हजार 731 जणांचे प्राण वाचवले आहेत. प्रशासनाने हेलिकॉप्टरद्वारे 793 जणांची सुटका केली आहे. बोटीच्या माध्यमातून 780 जणांना तर ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या सहाय्याने 212 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हवाई दलाचे दोन मिग-17 हेलिकॉप्टर, लष्कराचे 60 आणि एनडीआरएफचे 180 जवान बचाव कार्यात गुंतले आहेत.