देव तारी त्याला कोण मारी! हिमाचलमधील पुरात एका कुत्र्याने 'असा' वाचवला ६७ लोकांचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:28 IST2025-07-08T12:26:57+5:302025-07-08T12:28:11+5:30
Himachal Flood : हिमाचल प्रदेशातील मंडी येथे अचानक आलेल्या पुरामुळे धर्मपूर परिसरातील सियाठी गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. या गावातील लोकांनी मंदिरात आश्रय घेतला आहे.

फोटो - ndtv.in
हिमाचल प्रदेशातील मंडी येथे अचानक आलेल्या पुरामुळे धर्मपूर परिसरातील सियाठी गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. या गावातील लोकांनी मंदिरात आश्रय घेतला आहे. २० कुटुंबातील ६७ लोक सात दिवसांपासून मंदिरात राहत आहेत. त्या भयानक रात्रीबद्दल बोलताना गावकऱ्यांनी सांगितलं की, रात्री १२ ते १ वाजताच्या दरम्यान प्रचंड विनाश झाला. संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं. जर गावातील एक कुत्रा भुंकला नसता तर कोणीही वाचलं नसतं.
गावातील रहिवासी नरेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जूनची ती रात्र मी विसरू शकत नाही. मुसळधार पाऊस पडत होता. पण रात्री १२ वाजण्याच्या सुमारास, दुसऱ्या मजल्यावर झोपलेला कुत्रा अचानक जोरजोरात भुंकू लागला आणि नंतर रडू लागला. कुत्र्याच्या सतत रडण्याच्या आवाजाने माझी झोप उडाली. मी कुत्र्याजवळ पोहोचलो तेव्हा मला दिसलं की घराला मोठ्या भेगा पडल्या आहेत. पाणी वेगाने येत आहे. मी कुत्र्यासह खाली धावलो आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना जागं केलं.
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
इतर गावकऱ्यांना जागं करण्यात आलं आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पळून जाण्यास सांगण्यात आलं. त्रियंबला गावातील लोकांना बोलावलं आणि त्यांना आपत्तीची माहिती दिली. पाऊस इतका जोरदार होता की, सियाठी गावातील पुरुष आणि महिला अनवाणी धावत होते. त्याच वेळी डोंगराचा एक मोठा भाग गावावर पडला. त्याखाली अनेक घरं गाडली गेली. आता गावात फक्त चार ते पाच घरं दिसतात. सर्वकाही उद्ध्वस्त झालं आहे.
पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
सियाठी गाव खाली वसलं होतं, आता येथील सर्व लोकांनी गेल्या सात दिवसांपासून त्रियंबला गावात बांधलेल्या नैना देवी मंदिरात आश्रय घेतला आहे. गावात उपस्थित असलेल्या हिमाचल आरोग्य विभागाच्या पथकाने सांगितलं की, यामध्ये वृद्ध, महिला आणि लहान मुलं आहेत. दुर्घटनेमुळे महिला आणि वृद्धांमध्ये ब्लड प्रेशर आणि डिप्रेशनची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.