पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान शुक्रवारी सकाळपासून चंदीगड आणि अंबालामध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजत आहेत. चंदीगडच्या हवाई दलाच्या तळावरून हे सायरन वाजवले जात असून, नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर, एखादे अतिमहत्त्वाचे काम नसेल, तर घराबाहेर पडणे टाळा, असे लोकांना सांगण्यात आले आहे.पटियाला, फिरोजपूर, फाजिल्का, अमृतसर, गुरुदासपूर आणि तरनतारन येथेही अशाच प्रकारचे इशारे देण्यात आले आहेत.
चंदीगडचे उपयुक्त निशांत कुमार यादव म्हणाले की, 'हवाई दलाच्या तळावरून सायरनकहा इशारा मिळाला आहे. पाकिस्तानमधून विमानतळाला लक्ष्य केले जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सर्व नागरिकांना घरातच राहण्याचा आणि बाल्कनी, खिडक्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे." मोहालीच्या उपायुक्त कोमल मित्तल यांनीही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचना विशेषतः चंदीगडच्या सेक्टर ४५ आणि ४७ ला लागून असलेल्या मोहालीतील भागांसाठी आहे. चंदीगड आणि मोहालीच्या महत्त्वाच्या भागात पोलीस आणि प्रशासनाची गस्त सतत सुरू आहे.
सुरक्षा यंत्रणा हाय अलर्ट!
पाकिस्तानला लागून असलेल्या पंजाबमधील ६ जिल्ह्यांमध्ये पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंजाबची पाकिस्तानशी ५३२ किलोमीटर लांबीची सीमा आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण राज्यात सतर्कतेची परिस्थिती आहे. लुधियाना आणि जालंधर सारख्या प्रमुख शहरांमध्येही काल वीजपुरवठा खंडित झाला होता. या परिस्थितीही लोकांनी सैन्यावर विश्वास दाखवला आहे. जालंधरच्या झिरो लाईनवर असलेल्या एका गावातील लोकांनी सांगितले की, आम्हाला सैन्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे आम्हाला कुणाचीही भीती वाटत नाही. पाकिस्तानचे सर्व हवाई हल्ले लष्कराने आकाशातच हाणून पाडले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून, पंजाबमध्ये सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर आणि लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.