'वंदे भारत' एक्स्प्रेसवर दगडफेक, रेल्वे वाटणार चॉकलेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 10:27 AM2019-02-28T10:27:26+5:302019-02-28T11:52:11+5:30

'वंदे भारत' एक्स्प्रेसवर सातत्याने होणाऱ्या दगडफेकीमुळे रेल्वेने आता त्याबाबत काही पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ही एक्स्प्रेस ज्या मार्गाने धावते त्या मार्गावरील स्थानिक लोकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.

Here's what Railways is planning to protect Vande Bharat Express from stone pelting | 'वंदे भारत' एक्स्प्रेसवर दगडफेक, रेल्वे वाटणार चॉकलेट!

'वंदे भारत' एक्स्प्रेसवर दगडफेक, रेल्वे वाटणार चॉकलेट!

googlenewsNext
ठळक मुद्दे'वंदे भारत' एक्स्प्रेसवर सातत्याने होणाऱ्या दगडफेकीमुळे रेल्वेने आता त्याबाबत काही पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. एक्स्प्रेस ज्या मार्गाने धावते त्या मार्गावरील स्थानिक लोकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.एक्स्प्रेसवर दगडफेक करू नये यासाठी लहान मुलांना चॉकलेट आणि खेळणी वाटून ही गोष्ट चुकीची असल्याचं पटवून देण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन असलेल्या 'वंदे भारत' एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर 17 फेब्रुवारीपासून ही एक्स्प्रेस सर्वसामान्यांसाठी खुली झाली.  बुधवारी (27 फेब्रुवारी) काही समाजकंटकांकडून उत्तर प्रदेशमध्ये या एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली. वाराणसी-लखनौ मार्गावर ही दगडफेक करण्यात आली असून या दगडफेकीत एक्स्प्रेसच्या काचांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याआधीही अनेकवेळा 'वंदे भारत' एक्स्प्रेसवर समाजकंटकांनी दगडफेक केली होती.

'वंदे भारत' एक्स्प्रेसवर सातत्याने होणाऱ्या दगडफेकीमुळे रेल्वेने आता त्याबाबत काही पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ही एक्स्प्रेस ज्या मार्गाने धावते त्या मार्गावरील स्थानिक लोकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच एक्स्प्रेसवर दगडफेक करू नये यासाठी लहान मुलांना चॉकलेट आणि खेळणी वाटून ही गोष्ट चुकीची असल्याचं पटवून देण्यात येणार आहे. वेगात येणाऱ्या एक्स्प्रेसने एका बैलाला धडक दिल्याची घटना समोर आली होती. या घटनेत एक्स्प्रेसच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. त्यामुळे एक्स्प्रेसला कॅटल प्रोटेक्शन गार्ड लावण्याचा विचार सध्या रेल्वे करत असल्याची माहिती मिळत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.

'आरपीएफ'चे महासंचालक अरुण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही दगडफेक करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करण्याव्यतिरिक्त त्यांनी असे करू नये यासाठी त्यांचे समुपदेशन करणार आहोत. तसेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने दिल्लीतील झोपडपट्टी भागात जाऊन मुलांना चॉकलेट आणि खेळणी वाटून त्यांना दगडफेक करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आहे. कानपूर आणि अन्य काही भागात जाऊन अशाच पद्धतीने लोकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसला 16 वातानुकूलित डबे आहेत. यापैकी 14 डबे चेअर कार आहेत, तर दोन डबे एक्झिक्युटिव्ह श्रेणीतले आहेत. त्यापैकी चेअर कारचं तिकीट 1760 रुपये निश्चित करण्यात आलं असून, एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी 3310 रुपये मोजावे लागतात. 'वंदे भारत एक्स्प्रेस'ने तुम्ही परतीचा प्रवासही करणार असाल, तर या प्रवासासाठी चेअर कारचं तिकीट 1700 रुपये असेल आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचे 3260 रुपये होतील. या ट्रेनची क्षमता 1128 प्रवासी इतकी आहे. या दोन्ही तिकिटदरांमध्ये जेवणाची रक्कम समाविष्ट आहे. 

वंदे भारत एक्स्प्रेसची 'ही' वैशिष्ट्ये आहेत खास

- 'मेक इन इंडिया' योजनेचा हिस्सा असलेली भारतातली ही पहिली इंजिनलेस रेल्वे आहे.

- चाचणीदरम्यान या रेल्वेनं ताशी 180 किलोमीटरचा वेग पार केला असून, ती ताशी दोनशे किलोमीटर या वेगानं पळू शकते.

- 16 डबे असलेली ही रेल्वे पूर्णत: वातानुकूलित आहे. या रेल्वेची रचना अशा पद्धतीनं करण्यात आली आहे, की प्रवाशांना थेट ड्रायव्हरची केबिनही दिसू शकेल.

- या रेल्वेला स्वयंचलित दरवाजे आणि स्लायडिंग फूटस्टेप्स असतील. प्रवाशांना वेगवान मोफत वायफाय आणि इन्फोटेनमेंट मिळेल. रेल्वेत झिरो डिस्सार्ज बायो व्हॅक्युम शौचालयं असतील.

- रेल्वेत एलइडी लाइट्स, मॉड्युलर टॉयलेट्स आणि 'अ‍ॅस्थेटिक टच फ्री बाथरूम्स' असतील, शिवाय अपंगांसाठीही मैत्रीपूर्ण सुविधा असेल. रेल्वेच्या दोन्ही टोकांना ड्रायव्हर केबिन्स असतील.

- जीपीएस प्रणालीद्वारे प्रत्येक प्रवाशाची माहिती रेल्वेला मिळू शकेल. प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे असतील.सर्व डबे एकमेकांशी संलग्न असतील. आणीबाणीच्या प्रसंगी चालक दलाशी थेट संपर्काची यंत्रणा रेल्वेत असेल.

- पहिल्या 'ट्रेन 18'मध्ये 16 चेअरकार डबे असतील. त्यातील 14 डबे 'नॉन एक्झिक्युटिव्ह' तर दोन डबे 'एक्झिक्युटिव्ह' असतील. प्रत्येक डब्यातील प्रवाशांची संख्या अनुक्रमे 78 आणि 56 असेल.

- 'एक्झिक्युटिव्ह' क्लासमधील आसनव्यवस्था फिरती असेल आणि रेल्वे ज्या दिशेनं जातेय, त्या दिशेनं आपलं आसन फिरवता येऊ शकेल.

- ही रेल्वे येत्या काळात 'शताब्दी एक्सप्रेस'ची जागा घेईल. सुरुवातीच्या टप्प्यात अशा नऊ रेल्वे देशात वेगवेगळ्या मार्गावर धावतील. ही रेल्वे बनवण्यासाठी शंभर कोटी रुपये खर्च आलेला आहे. आयात रेल्वेपेक्षा हा खर्च निम्म्यानं कमी आहे.

Web Title: Here's what Railways is planning to protect Vande Bharat Express from stone pelting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.