संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 12:38 IST2025-05-18T12:37:59+5:302025-05-18T12:38:16+5:30
Operations Sindoor: वन मिशन, वन मेसेज, वन भारत या अंतर्गत सर्वपक्षीय शिष्टमंडळातील प्रत्येक ग्रुपमधील सदस्य, त्यांची नावे, कोणती टीम कोणत्या देशात जाणार? सविस्तर माहिती एका क्लिकवर...

संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
Operations Sindoor: भारताच्या लष्कराने पाकिस्तानचे मोठे नुकसान केल्यानंतर भारत सरकार आता 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने पाकिस्तानवर जागतिक पातळीवर दबाव वाढविण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान कसा दहशतवादाचा पोशिंदा आहे, हे ठसवण्यासाठी आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी जगातील प्रमुख ७-८ देशांमध्ये खासदारांची शिष्टमंडळे पाठविण्याची केंद्रातील मोदी सरकारची योजना आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व कोण करणार, या नेत्यांची नावे समोर आल्यानंतर आता प्रत्येक टीममध्ये किती आणि कोणते सदस्य असणार आहे. हे प्रत्येक शिष्टमंडळ कोणत्या देशांना भेटी देणार आहेत, याबाबतची एक संपूर्ण यादीच आता समोर आली आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगापुढे आणण्यासाठी भारत सरकारकडून विविध देशांमध्ये पाठविल्या जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्यांची यादी तयार केली आहे. या शिष्टमंडळांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी काँग्रेसचे खासदार शशी थरूर, भाजपाचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिंदेसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, जनता दल (यू)चे संजयकुमार झा आणि द्रमुक नेत्या कनिमोझी करुणानिधी यांच्या खांद्यावर टाकली आहे. या सात शिष्टमंडळामध्ये चार नेते सत्ताधारी एनडीएमधील असून तीन इंडिया आघाडीकडून आहेत.
कोणाच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात कोणकोणते नेते सदस्य अन् कोणत्या देशांना देणार भेटी?
- ग्रुप १: बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात खासदार निशिकांत दुबे, खासदार कोन्याक, रेखा शर्मा, असदुद्दीन ओवेसी, सतनाम सिंग सिंधू, गुलाम नबी आझाद, हर्ष श्रृंगला हे सदस्य असणार आहेत. ही टीम सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन, अल्जेरिया या देशांना भेटी देणार आहेत.
- ग्रुप २: रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात खासदार दग्गुबती पुरंदेश्वर, प्रियांका चतुर्वेदी, गुलाम अली खटाना, अमर सिंग, समिक भट्टाचार्य, एमजे अकबर, पंकज सरण हे सदस्य आहेत. ही टीम युके, फ्रान्स, जर्मनी, ईयू, इटली आणि डेन्मार्क या देशांमध्ये जाणार आहे.
- ग्रुप ३: संजय कुमार झा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात खासदार अपराजिता सारंगी, युसूफ पठाण, ब्रिजलाल, जॉन ब्रिटास, प्रदान बरुआ, हेमांग जोशी, सलमान खुर्शीद, मोहन कुमार हे सदस्य आहेत. ही टीम इंडोनेशिया, मलेशिया, कोरिया, जपान आणि सिंगापूर या देशांना भेटी देणार आहे.
- ग्रुप ४: श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात खासदार बांसुरी स्वराज, ईटी मोहम्मद बशीर, अतुल गर्ग, सस्मित पात्रा, मनन कुमार मिश्रा, एसएएस अहलुवालिया, सुजन चिनॉय या सदस्यांचा समावेश आहे. ही टीम युएई, लायबेरिया, काँगो, सिएरा लिओन या देशांना भेट देणार आहे.
- ग्रुप ५: शशी थरुर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात खासदार शांभवी, सरफराज अहमद, जीएम हरीश बालयोगी, शशांक मणी त्रिपाठी, भुवनेश्वर कलिता, मिलिंद देवरा, तरनजीत सिंग सिंधू, तेजस्वी सूर्या हे सदस्य असून, ही टीम अमेरिका, पनामा, गयाना, ब्राझील आणि केलंबिया या देशात जाणार आहे.
- ग्रुप ६: कनिमोझी करुणानिधी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात खासदार राजीव राय, मियां अल्ताफ अहमद , कॅप्टन ब्रिजेश चौटा , प्रेमचंद गुप्ता, अशोक कुमार मित्तल, मंजीव एस. पुरी, जावेद अश्रफ या सदस्यांचा समावेश असून, स्पेन, ग्रीस, स्लोव्हेनिया, लाटविया आणि रशिया या देशांमध्ये ही टीम जाणार आहे.
- ग्रुप ७: सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात राजीव प्रताप रुडी, विक्रमजीत सिंह साहनी, मनीष तिवारी, अनुराग सिंह ठाकूर, श्री कृष्ण देवरायालू, आनंद शर्मा, व्ही. मुरलीधरन, सय्यद अकबरुद्दीन हे सदस्य आहेत. ही टीम इजिप्त, कतार, इथिओपिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांना भेट देणार आहे.
One mission. One message. One Bharat 🇮🇳
— Kiren Rijiju (@KirenRijiju) May 17, 2025
Seven All-Party Delegations will soon engage key nations under #OperationSindoor, reflecting our collective resolve against terrorism.
Here’s the list of MPs & delegations representing this united front. https://t.co/1igT7D21mZpic.twitter.com/3eaZS21PbC