इथे भारत-पाकिस्तानचे लष्कर बनले मित्र, एकमेकांसोबत केला युद्धसराव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 16:25 IST2018-08-25T16:23:48+5:302018-08-25T16:25:27+5:30
भारत आणि पाकिस्तान यांचे नाते सख्खे शेजारी आणि पक्के वैरी असेच. त्यात सीमेपलीकडून होणाऱ्या कारवाया आणि दहशतवादामुळे दोन्ही देशांच्या लष्करांचे संबंधही नेहमी ताणलेलेच असतात. अशा परिस्थितीत...

इथे भारत-पाकिस्तानचे लष्कर बनले मित्र, एकमेकांसोबत केला युद्धसराव
नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान यांचे नाते सख्खे शेजारी आणि पक्के वैरी असेच. त्यात सीमेपलीकडून होणाऱ्या कारवाया आणि दहशतवादामुळे दोन्ही देशांच्या लष्करांचे संबंधही नेहमी ताणलेलेच असतात. अशा परिस्थितीत एकमेकांवर गोळीबार करणाऱ्या दोन्ही देशांच्या सैन्याने एकत्र येऊन युद्धसराव केला असे सांगितल्यास कुणाला खरे वाटणार नाही. मात्र भारत आणि पाकिस्तानचे लष्कर सध्या रशियामध्ये एकत्र येऊन युद्धसराव करत आहेत.
रशियातील चेल्याबिन्स्क येथे शांतता मोहीम 2018 अंतर्गत शुक्रवारपासून हा संयुक्त युद्धसराव सुरू झाला आहे. या युद्धसरावामध्ये शांघाई को ऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये समावेश असलेले सर्व देश सहभागी झाले आहेत. भारत आणि पाकिस्तान हेसुद्धा चीनचा प्रभाव असलेल्या या संघटनेचे सदस्य आहेत. त्यामुळे हे दोन्ही देशांनीही या युद्धसरावात भाग घेतला आहे.
या सरावाबाबत लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी सांगितले की "या युद्धसरावामुळे शांघाई को ऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये सहभागी असलेल्या देशांना दहशतवादविरोधी कारवायांना प्रत्युत्तर देण्याचे प्रशिक्षण मिळेल. या प्रशिक्षणादरम्यान, औपचारिक चर्चा, कारवाईदरम्यान आपापसातील ताळमेळ, संयुक्त कमांडची स्थापना, कंट्रोल स्ट्रक्चर आणि दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्याबाबतच्या मॉक ड्रिलसारखा अभ्यास करण्यात येणार आहे."
या युद्धसरावामध्ये यजमान रशियाचे 1700, चीनचे 700 आणि भारताचे 200 जवान सहभागी झाले आहेत. भारताकडून पाठवण्यात आलेल्या जवानांमध्ये राजपूत रेजिमेंट आणि हवाई दलाच्या जवानांचा समावेश आहे.