अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 23:45 IST2025-12-23T23:40:50+5:302025-12-23T23:45:37+5:30
Haryana Accident News: हरयाणातील झझ्झर येथे भरधाव कारवर अवजड ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात झझ्झर रेवाडी रोडवर झाला. पशुखाद्य घेऊन जात असलेला अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला. त्यामुळे कारमधून प्रवास करत असलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू
हरयाणातील झझ्झर येथे भरधाव कारवर अवजड ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात झझ्झर रेवाडी रोडवर झाला. पशुखाद्य घेऊन जात असलेला अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला. त्यामुळे कारमधून प्रवास करत असलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये हरयाणामधील एक आणि उत्तर प्रदेशमधील ४ जणांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. दरम्यान, या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
कारवर उलटलेला ट्रक अवजड असल्याने ट्रक हटवण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. तसेच हा ट्रक पशुखाद्याने भरलेला असल्याने त्याखाली कार पूर्णपणे दबली गेली आणि कारमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांना वाचण्याची संधीही मिळाली नाही. प्राथमिक तपासामध्ये ओव्हरलोडिंग आणि भरधाव वेगामुळे हा अपघात झाल्याचे समोर येत आहे.
हरयाणामधील सुरहा गावातील रहिवासी असलेल्या राम अवतार याचा शटरिंगचा व्यवसाय होता. संध्याकाळी तो साईटवर गेला आमि तिथे काम करत असलेल्या कामगारांना घेऊन त्यांना सोडण्यासाठी दिल्ली गेटकडे जात होता. त्याच्यासोबत उत्तर प्रदेशमधील पिंटू, मुन्ना, अखिलेश आणि जयबीर हे कामगार होते. त्यांची कार गुरुग्राम फ्लायओव्हरजवळ आली असताना रेवाडीकडून येत असलेला भरधाव ट्रक त्यांच्या कारवर उलटला. त्यामुळे रामअवतार आणि कारमधील इत कामगारांचा जागीच मृत्यू झाला.