रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 23:13 IST2025-10-14T23:11:44+5:302025-10-14T23:13:01+5:30
J&K News: जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली.

रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली. आजारी मुलाला रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. या धक्क्याने वडिलांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच वेळी बाप-लेकाचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४५ वर्षीय शबीर अहमद गनिया हे आपल्या १४ वर्षीय आजारी मुलगा साहिल अहमद याला उपचारासाठी बनिहाल येथील रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र, वाटेतच साहिलने वडिलांच्या हातात अखेरचा श्वास घेतला. मुलाचा मृत्यू झाल्याचा प्रचंड मानसिक धक्का शबीर गनिया यांना सहन झाला नाही. या धक्क्यामुळे त्यांना जागीच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचाही मृत्यू झाला. सकाळी वडील आणि मुलाचे मृतदेह बनिहाल उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
उत्तर प्रदेश: नवजात मुलीची हत्या करून मृतदेह कालव्यात फेकण्याचा प्रयत्न
उत्तर प्रदेशातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली. एका निर्दयी मातेने आपल्या नवजात मुलीची हत्या करून तिचा मृतदेह कालव्यात फेकण्याचा प्रयत्न केला. आरोपी महिला मृत मुलीला पिशवीत भरून कालव्यात फेकून देण्यासाठी जात असताना स्थानिकांनी तिला पाहिले आणि पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्या महिलेला अटक केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलिसांनी या मातेविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.