हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 06:00 IST2025-12-21T06:00:02+5:302025-12-21T06:00:26+5:30
आसामच्या होजई जिल्ह्यात राजधानी एक्स्प्रेस हत्तींच्या कळपाला धडकून ७ हत्ती चिरडले.

हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
नगांव : आसामच्या होजई जिल्ह्यात सायरंग-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस हत्तींच्या कळपाला धडकल्याने भयंकर अपघात झाला. या दुर्घटनेत सात हत्ती जागीच ठार, तर एक पिल्लू जखमी झाले. शुक्रवारी मध्यरात्री हा अपघात झाला. यात रेल्वेचे पाच डबे व इंजिन रुळावरून घसरले. सुदैवाने या अपघातात प्रवाशांना इजा झाली नाही.
दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. चांगजुराई गावाजवळ सायरंग-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस आल्यानंतर रात्री दोन वाजून १७ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. मृत हत्तींचे शवविच्छेदन सुरू असून, जखमी पिलावर पशुवैद्यकीय उपचार सुरू आहेत.
हत्तीच्या कळपाला पाहिल्यानंतर रेल्वेचालकाने ब्रेक लावले. मात्र, ही धडक टळू शकली नाही. रेल्वे विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. सकाळी सहा वाजता रुळावरून घसरलेले डबे आहे तिथेच सोडून राजधानी एक्स्प्रेस प्रवाशांना घेऊन गुवाहाटीकडे रवाना झाली. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.