काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 09:57 IST2025-12-29T09:57:02+5:302025-12-29T09:57:54+5:30
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सध्या त्या निष्पाप बालकाला वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
ओडिशामधील देवगड जिल्ह्यातून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. मात्र, या घटनेतील सर्वात हृदयद्रावक भाग म्हणजे या मृत दाम्पत्याचा ५ वर्षांचा मुलगा त्या गडद अंधारात, निर्जन जंगलात आपल्या आई-वडिलांच्या मृतदेहापाशी रात्रभर बसून होता.
दुमंत मांझी (३४) आणि त्यांची पत्नी रिंकी मांझी (२८) हे शनिवारी संध्याकाळी आपल्या मुलासह सासरहून परतत होते. वाटेत दलाक छकाजवळ त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात या दोघांनीही मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभी केली आणि जवळच्या जंगलात जाऊन कीटकनाशक पिऊन जीवन संपवले.
आई-वडील बेशुद्ध पडल्यावर ५ वर्षांच्या मुलाला नेमके काय झाले आहे हे समजले नाही. तो रात्रभर त्यांच्या बाजूला बसून राहिला. रविवारी सकाळी उजाडताच या मुलाने कसाबसा जंगलाबाहेरचा रस्ता गाठला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना रडत रडत घटनेची माहिती दिली.
स्थानिकांनी तातडीने पोलिसांना बोलावले. दुमंत यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर रिंकी यांना कटक येथील रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सध्या त्या निष्पाप बालकाला वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.