"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:36 IST2025-11-14T18:35:42+5:302025-11-14T18:36:28+5:30
आतापर्यंत डॉ. अदिलच्या चौकशीचे केंद्र 'फेमस मेडिकेअर हॉस्पिटल' होते, परंतु आता तपासाचे धागेदोरे शहरातील 'वी ब्रोस हॉस्पिटल'पर्यंत पोहोचले आहेत.

"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
देशाच्या राजधानीत अर्थात दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला आता मोठे वळण मिळाले आहे. या हल्ल्यातील संशयास्पद आरोपी डॉ. अदिलशी संबंधित चौकशी उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये सुरू आहे, ज्यामध्ये आता दहशतवादविरोधी पथकाने आपला तपास अधिक गतिमान केला आहे. आतापर्यंत डॉ. अदिलच्या चौकशीचे केंद्र 'फेमस मेडिकेअर हॉस्पिटल' होते, परंतु आता तपासाचे धागेदोरे शहरातील 'वी ब्रोस हॉस्पिटल'पर्यंत पोहोचले आहेत.
वी ब्रोस हॉस्पिटलमध्ये एटीएसची चौकशी
एटीएस आणि इतर संबंधित तपास पथकांनी 'वी ब्रोस हॉस्पिटल'मध्ये धडक देऊन तेथील व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली. अधिकाऱ्यांनी डॉ. अदिलचा या रुग्णालयातील कार्यकाळ, त्याचे वागणे, त्याचा मागील व्यावसायिक रेकॉर्ड आणि त्याचे सहकारी यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल माहिती गोळा केली.
रुग्णालयाचे व्यवस्थापन काय म्हणाले?
या घडामोडीला दुजोरा देताना 'वी ब्रोस हॉस्पिटल' चालवणाऱ्या ऑस्कर ग्रुपच्या उपाध्यक्ष डॉ. ममता यांनी सांगितले की, तपास पथकाने डॉ. अदिलच्या वर्तणुकीबद्दल, रुग्णालयातील त्याच्या उपस्थितीबद्दल आणि त्याच्या कामाच्या पद्धतीबद्दल सविस्तर चौकशी केली.
डॉ. ममता यांच्या माहितीनुसार, डॉ. अदिलची भरती ऑस्कर ग्रुपच्या रोहतक कार्यालयाच्या माध्यमातून झाली होती. त्यांनी सांगितले की, "डॉ. अदिलने आमच्या रुग्णालयात अंदाजे अडीच महिने काम केले होते."
नोकरी सोडण्याचे कारण ठरला पगार
डॉ. ममता यांनी डॉ. अदिलने नोकरी का सोडली या मागचे कारण देखील सांगितले. त्या म्हणाल्या की, अदिल त्याच्या ४ लाख रुपयांच्या वार्षिक पगारावर समाधानी नव्हता. त्याला 'फेमस मेडिकेअर हॉस्पिटल'मधून ५.५ लाख रुपयांचे अधिक आकर्षक सॅलरी पॅकेज मिळाल्यानंतर त्याने लगेचच 'वी ब्रोस हॉस्पिटल'मधील नोकरी सोडून तिकडे गेला होता.
डॉ. ममता यांनी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित या गंभीर प्रकरणात आपले रुग्णालय तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करेल, असे स्पष्ट केले आहे.