‘हा २००८ चा बदला’ असे तो म्हणत होता, एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणात साक्षीदाराने नोंदवला जबाब
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 08:19 IST2025-11-11T08:19:27+5:302025-11-11T08:19:43+5:30
Express firing case: जुलै २०२३ मध्ये झालेल्या एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणातील एका साक्षीदाराने सोमवारी सत्र न्यायालयाला साक्ष दिली की, त्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक दाढीवाला माणूस आणि जवळच रायफल घेऊन उभा असलेला आरोपी जवान पाहिला. ‘हा २००८ चा बदला आहे...’असे तो जवान म्हणत होता.

‘हा २००८ चा बदला’ असे तो म्हणत होता, एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणात साक्षीदाराने नोंदवला जबाब
मुंबई - जुलै २०२३ मध्ये झालेल्या एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणातील एका साक्षीदाराने सोमवारी सत्र न्यायालयाला साक्ष दिली की, त्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक दाढीवाला माणूस आणि जवळच रायफल घेऊन उभा असलेला आरोपी जवान पाहिला. ‘हा २००८ चा बदला आहे...’असे तो जवान म्हणत होता. माजी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरीवर त्याचे वरिष्ठ सहकारी असिस्टंट सब-इन्स्पेक्टर टीका राम मीना, तसेच तीन प्रवाशांचा खून केल्याचा आरोप आहे. ही घटना ३१ जुलै २०२३ रोजी जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये पालघर रेल्वेस्थानकाजवळ घडली होती. चौधरीला घटनेनंतर रेल्वे रुळांवरून पळताना पकडण्यात आले.
घटनेवेळी एस-६ कोचमध्ये प्रवास
साक्षीदार जीएसटी विभागात कार्यरत आहे, तो त्या वेळी रेल्वेच्या एस-६ कोचमध्ये प्रवास करत होता. साक्षीदाराने अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय. बी. पठाण (दिंडोशी न्यायालय) यांच्यासमोर साक्ष दिली. ‘त्या’ भयंकर दृश्यामुळे मी घाबरलो आणि डब्याच्या दुसऱ्या टोकाकडे चालू लागलो, तेव्हाच मी त्या आरपीएफ कर्मचाऱ्याला ‘हा २००८ चा बदला आहे’ असे म्हणताना ऐकले, असे साक्षीदाराने सांगितले.
जवानाला रुळांवर उतरताना पाहिले
अतिरिक्त सरकारी वकील सुधीर सापकळे यांनी म्हटले की, साक्षीदाराने आरपीएफ कॉन्स्टेबलला रेल्वे रुळांवर उतरताना पाहिले, तर बचाव पक्षाने ही साक्ष खोटी असल्याचे न्यायालयाला सांगितले. चौधरीने रेल्वेच्या चालत्या डब्यात प्रवाशांना ठार मारताना अनेक धार्मिक द्वेषयुक्त विधाने केली होती.