आजारी असताना दिली परीक्षा, पण निकालापूर्वीच १७ दिवस आधी झाला मृत्यू, आता जिल्ह्यात आली आठवी, पालक सुन्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 22:03 IST2025-05-05T22:03:42+5:302025-05-05T22:03:42+5:30
देशातील विविध राज्यांमधील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डांच्या परीक्षांचे निकाल सध्या जाहीर होत आहेत. दरम्यान, १७ दिवसांपूर्वीच मृत्यू झालेली ...

आजारी असताना दिली परीक्षा, पण निकालापूर्वीच १७ दिवस आधी झाला मृत्यू, आता जिल्ह्यात आली आठवी, पालक सुन्न
देशातील विविध राज्यांमधील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डांच्या परीक्षांचे निकाल सध्या जाहीर होत आहेत. दरम्यान, १७ दिवसांपूर्वीच मृत्यू झालेली एक मुलगी निकालांमध्ये शाळेतून पहिली आल्याची घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. जेव्हा तिचं गुणपत्रक नातेवाईक आणि इतरांनी पाहिलं तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले. थैबी मुखर्जी असं या मुलीचं नाव आहे. थैबी मुखर्जी हिने बंगाल बोर्डाची दहावीची परीक्षा दिली होती. मात्र ती निकाल पाहू शकली नाही. निकालापूर्वीच काही दिवस आधी तिचा आजारपणेमुळे मृत्यू झाला होता. दरम्यान, निकाल लागल्यानंतर तिला मिळालेलं यश पाहून नातेवाईकांसह शाळेतील शिक्षकांचेही डोळे पाणावले.
थैबी मुखर्जी हिचं कुटुंब आसनसोल येथे राहणारं आहे. परीक्षेच्या काही दिवस आधी थैबी हिला काविळ झाली होती. तसेच या आजारपणातही ती दररोज औषधं घेऊन परीक्षा द्यायला जायची. परीक्षेनंतर तिच्यावर उपचारही करण्यात आले मात्र तिची तब्येत बिघडत गेली. अखेरीस निकाल येण्यापूर्वी १७ दिवस आधी तिचा मृत्यू झाला.
थैबीच्या मृत्युमुळे तिच्या कुटुंबीयांना झालेलं दु:ख कायम असतानाच पश्चिम बंगाल बोर्डाचे निकाल जाहीर झाले. या निकालांमध्ये थैबी ही वर्गातून पहिली, तर जिल्ह्यातून आठवी आली. थैबी ही आसनसोलमधील उमरानी गोराई महिला कल्याण स्कूलमधील विद्यार्थिनी होती. तिचं नाव जिल्ह्यातील अव्वल विद्यार्थ्यांमध्ये पाहून शाळेपासून नातेवाईकांपर्यंत सारेजण भावूक झाले. तिचं गुणपत्रक पाहून नातेवाईकांनाही अश्रू अनावर झाले.