"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 12:51 IST2025-05-06T12:50:36+5:302025-05-06T12:51:42+5:30
लग्नाच्या दोन दिवस आधी नवरदेवाची चार वर्षांपासूनची गर्लफ्रेंड साखरपुड्याच्या समारंभात आली आणि तिने अनेक गुपितं उघड केली.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशच्या बागपतमधील गल्हेता गावात एक अजब घटना घडली आहे. साखरपुड्याच्या दिवशी असं काही घडलं ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. लग्नाच्या दोन दिवस आधी नवरदेवाची चार वर्षांपासूनची गर्लफ्रेंड साखरपुड्याच्या समारंभात आली आणि तिने अनेक गुपितं उघड केली. तिने सांगितलं की, ती चार वर्षांपासून या तरुणासोबत राहत आहे आणि आता ती त्याच्या मुलाची आई होणार आहे. गर्लफ्रेंडने जे सांगितलं ते ऐकून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
बागपतमधील गल्हेता गावात राहणाऱ्या सुमनचं लग्न दिल्लीतील प्रताप विहार कॉलनीतील रहिवासी गौरवशी ठरलं होतं. ५ मे ही तारीख ठरली होती आणि त्याच्या फक्त दोन दिवस आधी ३ मे रोजी साखरपुडा समारंभ होणार होता. सुमनचं कुटुंब शगुनसह दिल्लीला पोहोचलं. सर्व तयारी आनंदाने सुरू होती. पण मंडपात आलेल्या एका तरुणीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
गौरवने लग्नाचं आश्वासन देऊन फसवलं
हातात काही मेडिकल रिपोर्ट्स आणि मोबाईलवरील चॅट्सचे स्क्रीनशॉट घेऊन तिने वर गौरववर आरोप केले आणि म्हटलं की गौरव चार वर्षांपासून माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तो माझ्या होणाऱ्या बाळाचा बाप आहे. हे ऐकताच संपूर्ण हॉलमध्ये शांतता होती. मुलीने असा दावा केला आहे की, गौरवने लग्नाचं आश्वासन देऊन तिला फसवलं आणि आता जेव्हा ती आई होणार आहे, तेव्हा तो तिला सोडून दुसऱ्या मुलीशी लग्न करत आहे.
कठोर शिक्षा झाली पाहिजे
धक्का बसलेली आणि संतप्त झालेली वधू सुमन माध्यमांशी बोलताना म्हणाली, ज्या व्यक्तीला मी माझा जीवनसाथी म्हणून स्वीकारलं, त्याने खोट्याचा आधार घेतला. माझ्या वडिलांच्या प्रतिष्ठेला यामुळे धक्का बसला. अशा व्यक्तीला कायद्याने कठोर शिक्षा झाली पाहिजे. संपूर्ण कुटुंब लग्नाच्या तयारीत व्यस्त होतं. कुटुंबाने कर्ज घेऊन ही सर्व व्यवस्था केली होती. पण गौरव आणि त्याच्या कुटुंबाने आम्हाला फसवलं.