Hathras Gangrape: Now a panchayat organized by a former BJP MLA, allegations against the victim's family | Hathras Gangrape : आता भाजपाच्या माजी आमदाराने आयोजित केली पंचायत, पीडित कुटंबावरच केले आरोप

Hathras Gangrape : आता भाजपाच्या माजी आमदाराने आयोजित केली पंचायत, पीडित कुटंबावरच केले आरोप

ठळक मुद्देभाजपाचे माजी आमदार राजवीर सिंह पलहवान यांनी बोलावली होती ही पंचायत १४ सप्टेंबर रोजी संबंधित तरुणी आणि तिचा भाऊ पोलीस ठाण्यात तक्रार देऊन आले होते. मात्र त्यावेळी माध्यमांनी दखल घेतली नव्हतीनंतर प्रसारमाध्यमे आणि इतर राजकीय पक्षांच्या लोकांनी या कुटुंबाला भडकवले

हाथरस ( उत्तर प्रदेश) - हाथरस येथील एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान, या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणात राजकारणही खेळले जात आहे. आज एकीकडे हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवण्यासाठी एसआयटीचे पथक पुन्हा एकदा दाखल झाले. तर दुसरीकडे विविध पक्षांचे नेतेही या कुटुंबाची भेट घेण्यासाठी येत आहेत. यादरम्यान, आज हाथरसमध्ये एक पंचायतही बोलावण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार ही पंचायत भाजपाचे माजी आमदार राजवीर सिंह पलहवान यांनी बोलावली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी योगी सरकारने जे आदेश दिले आहेत त्यामुळे प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होईल, असा दावा या पंचायतीत करण्यात आला. ज्या दिवशी ही घटना घडली त्यानंतर बलात्कार झाल्याचे चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात आले, ही माहिती चुकीची आहे, असे राजवीर सिंह पलहवान यांनी सांगितले.

राजवीर सिंह म्हणाले की, आम्ही राज्य सरकारला सांगितले की, दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी झाले पाहिजे. यासाठी सर्वांची नार्को चाचणी झाली पाहिजे. सीबीआय तपासाचा आदेश आला पाहिजे. आम्ही राज्य सरकारकडे ही मागणी केली होती. आम्ही राज्य सरकारकडे ही मागणी केली होती. आता या पंचातीमध्ये जमलेले लोक प्रदेश सरकारच्या निर्णयावर समाधानी आहेत, असे राजवीर सिंह यांनी सांगितले. सरकारचे आभार मानण्यासाठी ही पंचायत बोलावली आहे, असेही ते पुढे म्हणाले.

१४ सप्टेंबर रोजी संबंधित तरुणी आणि तिचा भाऊ पोलीस ठाण्यात तक्रार देऊन आले होते. मात्र त्यावेळी माध्यमांनी दखल घेतली नव्हती. पण नंतर प्रसारमाध्यमे आणि इतर राजकीय पक्षांच्या लोकांनी या कुटुंबाला भडकवले. तीन दिवसांनंतर साक्ष बदलवण्यात आली. त्यानंतर दर तीन दिवसांनी साक्षी बदलत गेल्या आणि माध्यमे टीआरपीसाठी बातम्या चालवत राहिले, असे राजवीर सिंह म्हणाले. दरम्यान, राजवीर सिंह यांनी सामूहिक बलात्काराचे वृत्तही फेटाळून लावले. मागासवर्गीय समाजातील एका तरुणीला मारहाण झाल्याची खोटी माहिती पसरवून हाथरसला बदनाम करण्यात आले, असा दावाही त्यांनी केला.

"मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार", भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

याच दरम्यान भाजपाच्या एका नेत्याने वादग्रस्त विधान केलं आहे. मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक विधान केलं आहे. उत्तर प्रदेशच्या बलिया विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी ही मुक्ताफळं उधळली आहेत. हाथरस प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 
सुरेंद्र सिंह आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. "आपल्या मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणं हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात. अशा घटनांना शासन आणि तलवारी रोखू शकत नाहीत" असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये रामराज्याचा दावा केला जात असताना बलात्कारासारख्या घटना समोर येत आहेत. यामागचं कारण काय? असा प्रश्न सिंह यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hathras Gangrape: Now a panchayat organized by a former BJP MLA, allegations against the victim's family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.