निर्भयाच्या गुन्हेगारांची वकिली करणारे एपी सिंह लढवणार हाथरसमधील आरोपींचा खटला
By बाळकृष्ण परब | Updated: October 5, 2020 23:53 IST2020-10-05T23:51:27+5:302020-10-05T23:53:07+5:30
हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचा खटला निर्भयाच्या गुन्हेगारांची वकिली करणारे वकील एपी सिंह लढवणार असल्याचे वृत्त आहे.

निर्भयाच्या गुन्हेगारांची वकिली करणारे एपी सिंह लढवणार हाथरसमधील आरोपींचा खटला
लखनौ - उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. तर उत्तर प्रदेशात परकीय फंडिंगच्या माध्यमातून जातीय दंगल करण्याचे कारस्थान आखले जात असल्याचा दावा सरकारकडून येत आहे. या घटनेमुळे एकीकडे मागासवर्गीयांची एकजूट होत असतानाच काही संघटना आरोपींचा बचाव करण्यासाठी पुढे येत आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपींचा खटला निर्भयाच्या गुन्हेगारांची वकिली करणारे वकील एपी सिंह लढवणार असल्याचे वृत्त आहे. आरोपींचे वकील म्हणून एपी सिंह यांची नियुक्ती अखिल भारतीय क्षत्रिय महासभेने केली आहे. माजी केंद्रीय मंत्री राजा मानवेंद्र सिंह यांनी एपी सिंह यांना हाथरसमधील आरोपींचा खटला लढण्यास सांगितले आहे. मानवेंद्र सिंह यांच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की अखिल भारतीय क्षत्रिय महासभा पैसे गोळा करून वकील एपी सिंह यांची फी भरणार आहे.
हाथरस बलात्कार प्रकरणामधून एससी-एसटी अॅक्टचा दुरुपयोग करून सवर्ण समाजाला बदनाम केले जात आहे. या प्रकारामुळे राजपूत समाज मोठ्या प्रमाणावर दुखावला गेला आहे. त्यामुळे या प्रकरणात सत्य समोर आणण्यासाठी आरोपींच्या वतीने एपी सिंह यांना वकील म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नाही तर हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणामध्ये आयोपींच्या कुटुंबांच्यावतीनेसुद्धा एपी सिंह यांना वकिली करण्यास सांगण्यात आले आहे.