इतरांनी मृत समजले, पण तिने वाचवले; अपघातग्रस्त तरुणासाठी देवदूत बनून आली नर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 17:26 IST2025-05-22T17:24:43+5:302025-05-22T17:26:04+5:30
नर्सच्या प्रयत्नाने तरुणाचा श्वास पुन्हा सुरू झाला.

इतरांनी मृत समजले, पण तिने वाचवले; अपघातग्रस्त तरुणासाठी देवदूत बनून आली नर्स
हरियाणातील करनालमध्ये रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणासाठी एक महिला नर्सिंग सुपरवायझर देवदूत बनून आली. ज्या अपघातग्रस्त तरुणाला इतरांनी मृत समजून सोडून दिले होते, त्यालाच सीपीआर देऊन महिला नर्सने वाचवले. एवढेच नाही तर पोलिसांच्या मदतीने तिने तरुणाला रुग्णालयात नेले आणि आवश्यक उपचारही केले. तरुणाची प्रकृती थोडी सामान्य झाल्यानंतर त्याला कर्नालमधील कल्पना चावला रुग्णालयात रेफर करण्यात आले. या महिलेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून, तिच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महिला नर्स ठरली देवदूत
डॉक्टरांच्या मते तरुणाला वेळेवर सीपीआर दिला नसता तर त्या त्याचा जीव जाऊ शकला असता. याबाबत महिला नर्स अंकिता मान म्हणाली की, ती गेल्या दीड वर्षांपासून रुग्णालयात काम करते. मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास ती तिच्या मुलासाठी आईस्क्रीम आणण्यासाठी बाहेर आली होती. यावेळी दिला सेक्टर 6 मधील गुरुद्वाराजवळ रस्त्याच्या कडेला गर्दी जमलेली दिसली. तिने जवळ जाऊन पाहिले तर रस्त्याच्या कडेला एक तरुण बेशुद्ध पडलेला दिसला.
सीपीआर देऊन वाचवले प्राण
अंकिताने त्या तरुणाबद्दल विचारपूस केली असता इतरांनी तो मृत असल्याचे सांगितले. अंकिता वैद्यकीय क्षेत्रातील असल्याने तिने लगेच त्या तरुणाची नाडी तपासली अन् तिला तो तरुण जिवंत असल्याचे समजले. क्षणाचाही विलंबन न करता तिने त्या तरुणाला सीपीआर देण्यास सुरुवात केली. सीपीआर दिल्यानंतर त्या तरुणाची प्रकृती सुधारू लागली आणि तो पुन्हा श्वास घेऊ लागला. यानंतर अंकिताने ताबडतोब विर्क हॉस्पिटलची रुग्णवाहिका बोलावली आणि त्या तरुणाला रुग्णालयात नेले. तिथे प्राथमिक उपचार दिल्यानंतर त्याला कल्पना चावला मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले.
श्वासनलिकेमध्ये अन्न अडकले
अंकिताने सांगितले की, तो तरुण सुमारे 25 वर्षांचा होता. त्याचा अपघात झाला अन् अपघातानंतर त्याला उलट्या झाल्या. उलटी झालेले अन्न त्याच्या श्वासनलिकेमध्ये अडकल्यामुळे तो श्वास घेऊ शकला नव्हता. जेव्हा सीपीआर देण्यात आला तेव्हा त्याचा श्वास सुरू झाला. अंकिताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या या कामाचे शहरातून कौतुक होत आहे.