हरयाणा! पहिल्यांदाच आमदार झालेल्या आरती यांना मंत्रीपद; केंद्रीय मंत्र्याच्या मुलीने घेतली शपथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 16:37 IST2024-10-17T16:36:23+5:302024-10-17T16:37:05+5:30
Nayab Singh Saini takes oath as Haryana Chief Minister : हरयाणात पुन्हा एकदा भाजपने सरकार स्थापन केले.

हरयाणा! पहिल्यांदाच आमदार झालेल्या आरती यांना मंत्रीपद; केंद्रीय मंत्र्याच्या मुलीने घेतली शपथ
Haryana New Government : हरयाणात भाजपने सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले. नायब सिंह सैनी यांनी पुन्हा एकदा हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नायब सैनी दुसऱ्यांदा हरयाणाचे मुख्यमंत्री बनले आहेत. हरयाणाच्या नव्या सरकारमध्ये एका उपमुख्यमंत्र्यांसह १३ मंत्री करण्यात आले आहेत. खरे तर अटेली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकलेल्या आरती राव यांना नायब सिंह सैनी यांच्या सरकारमध्ये मंत्री करण्यात आले आहे. आरती सिंह राव या कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या दुसऱ्या महिला मंत्री ठरल्या. केंद्रीय मंत्री इंद्रजीत राव सिंह यांची कन्या आरती राव या अटेली मतदारसंघातून निवडून आल्या आणि प्रथमच आमदार झाल्या.
इंद्रजीत राव सिंह हे पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. आरती राव दीर्घकाळापासून हरयाणा भाजपमध्ये सक्रिय होत्या. त्या खेळाडूही राहिल्या आहेत. मागच्या वेळीही त्यांनी तिकीट मागितले होते पण ते मिळू शकले नाही. यावेळी अटेली या मतदारसंघातून त्यांनी आमदार होण्याचा मान पटकावला. आरती राव यांच्या नावावर ६६ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे दिल्लीत ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दोन फ्लॅट आहेत. ७७ लाखांहून अधिक किमतीचे सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिनेही आहेत. पण त्यांच्या नावावर कोणत्याही वाहनाची नोंद नाही.
दरम्यान, नायब सिंह सैनी यांनी गुरुवारी पंचकुलामध्ये एका भव्य समारंभात हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि एनडीएचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. याशिवाय, भाजपाशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित होते. नायब सिंह सैनी यांच्यासह १४ आमदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अनिल विज यांनी मंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. तसेच यावेळी दोन महिला आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. केंद्रीय मंत्री इंद्रजीत राव सिंह यांची मुलगी आरती राव आणि माजी मुख्यमंत्री चौधरी बन्सीलाल यांची नात व तोशाम मतदारसंघाच्या आमदार श्रुती चौधरी यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.