हरियाणात ‘नायब’ सरकारने जिंकले विश्वासमत, ‘जजप’ आमदार अनुपस्थित, आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 05:28 IST2024-03-14T05:27:59+5:302024-03-14T05:28:53+5:30
काँग्रेसने सीक्रेट व्होटिंगची मागणी केली होती. मात्र, अध्यक्षांनी ती फेटाळली.

हरियाणात ‘नायब’ सरकारने जिंकले विश्वासमत, ‘जजप’ आमदार अनुपस्थित, आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क, चंडिगड :हरयाणाचे मुख्यमंत्री झाल्यानंतर नायब सिंह सैनी यांनी दुसऱ्याच दिवशी बुधवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केले. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.
विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी जननायक जनता पक्षाचे आमदार सभागृहातून बाहेर पडले. यासंदर्भात पक्षाकडून व्हीप जारी करण्यात आला होता. मंगळवारी मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप आणि जेजेपी यांच्यातील युती तुटली होती. काॅंग्रेसने सीक्रेट व्हाेटिंगची मागणी केली हाेती. मात्र, अध्यक्षांनी ती फेटाळली.
‘जनतेचा सरकारवर आजही विश्वास’
विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री नायब सिंह सैनी म्हणाले की, हरयाणातील जनतेचा विश्वास आजही सरकारवर आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या साडेनऊ वर्षांत ज्याप्रमाणे राज्यात सर्वांगीण विकास झाला, जनतेला सुविधा मिळाल्या, त्याच विचारसरणीला पुढे नेत विद्यमान सरकार काम करेल.
सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता झाला मुख्यमंत्री
- सैनी यापूर्वी २०१४ ते २०१९ दरम्यान विधानसभेचे सदस्य होते. खट्टर सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते राज्यमंत्री होते. यानंतर ते भाजपच्या तिकिटावर कुरूक्षेत्रमधून खासदार झाले.
- यावेळी सैनी म्हणाले की, ते एका सामान्य कुटुंबातून आलेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील कोणीही राजकारणात नव्हते.