'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात 11 टक्क्यांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 22:41 IST2021-07-24T22:40:56+5:302021-07-24T22:41:27+5:30
dearness allowance : दरमहा सरकारच्या तिजोरीवर 210 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात 11 टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली : कोरोना संकटात हरयाणा सरकारने (Haryana Government) राज्यातील कर्मचार्यांना मोठी भेट दिली आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता म्हणजेच डीए (Dearness Allowance) दर 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्याची घोषणा केली आहे. नवीन दर 1 जुलै 2021 पासून लागू होईल.
राज्य सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, वाढलेल्या महागाई भत्त्यात 1 जानेवारी, 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 रोजी प्रलंबित असलेल्या डीएच्या वाढीचा समावेश आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील 2.85 लाख सरकारी कर्मचारी आणि 2.62 लाख निवृत्तीवेतनधारकांना होईल. त्याचबरोबर, यामुळे दरमहा सरकारच्या तिजोरीवर 210 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
किती येईल डीए?
तुमचा पगार किती वाढेल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला मूळ पगार चेक करावा लागेल. तसेच यानंतर तुमचा सध्याचा डीए चेक करावा लागेल. सध्या हा 17 टक्के आहे, तो डीए आता 28 टक्के झाला आहे. त्यामुळे मासिक डीएमध्ये 11 टक्क्यांनी वाढ होईल.
अलीकडेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याचा निर्णय
अलीकडेच मोदी सरकारमध्ये केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यावरील स्थगिती हटविण्याचा निर्णय घेतला होता. मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढविला. अशा प्रकारे डीएमध्ये एकूण 11 टक्के वाढ झाली. गेल्या बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
काय असतो महागाई भत्ता?
वाढत्या महागाईमुळे वस्तुंच्या किंमती वाढतात. त्यामुळे लोकांच्या हातात असलेला पैशाचं मूल्यंही कमी होतं. याचा सामना करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांची वाढत्या महागाईचा सामना करून आपल्या गरजेच्या वस्तू किंमती वाढल्यानंतरही खरेदी करण्याची क्षमता वाढते.