Farmers Protest: “शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, जशास तसे उत्तर द्या”; मुख्यमंत्र्यांचे खळबळजनक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 08:40 AM2021-10-04T08:40:58+5:302021-10-04T08:48:12+5:30

अलीकडेच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उत्तरेतील राज्यांत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जात आहे. 

haryana cm manohar lal khattar controversial statement over farmers protest | Farmers Protest: “शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, जशास तसे उत्तर द्या”; मुख्यमंत्र्यांचे खळबळजनक विधान

Farmers Protest: “शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, जशास तसे उत्तर द्या”; मुख्यमंत्र्यांचे खळबळजनक विधान

Next
ठळक मुद्देप्रत्येक भागात ५०० ते एक हजार कार्यकर्त्यांची फळी उभी कराआक्रमक शेतकऱ्यांना त्याच भाषेत उत्तर द्याहरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे खळबळजनक विधान

चंदीगड: वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात गेल्या १० महिन्यांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीतील सीमांवर आंदोलन सुरू आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि आंदोलक शेतकरी नेते आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. अलीकडेच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उत्तरेतील राज्यांत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जात आहे. यातच आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेल्या एका विधानामुळे खळबळ उडाली असून, यावरून विरोधकांनी आक्रमक होत टीका केली आहे. शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, जशास तसे उत्तर द्या, असे आक्षेपार्ह वक्तव्य मनोहरलाल खट्टर यांनी केले. (haryana cm manohar lal khattar controversial statement over farmers protest)

चंदीगड येथे एका कार्यक्रमात बोलताना मनोहर लाल खट्टर यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. या विधानानंतर विरोधकांनी आक्षेप नोंदवत खट्टर सरकारवर निशाणा साधला आहे. तर संयुक्त किसान मोर्चानेही टीका करत या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. मनोहर लाल खट्टर म्हणाले की, प्रत्येक भागात ५०० ते एक हजार कार्यकर्त्यांची फळी उभी करा. तेच शेतकऱ्यांना जशास तसे उत्तर देतील, असे खट्टर यांनी म्हटले आहे. 

आक्रमक शेतकऱ्यांना त्याच भाषेत उत्तर द्या

लाठ्या-काठ्या उचला. आक्रमक शेतकऱ्यांना तुम्हीही त्याच भाषेत उत्तर द्या. शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते. आम्हीही पाहून घेऊ. दोन-चार महिने कारागृहात राहून बाहेर आलात की तुम्हीही नेते व्हाल. जामिनाची काळजी करू नका, असे खट्टर यांनी म्हटले आहे. यावर संयुक्त किसान मोर्चाने प्रत्युत्तर दिले असून, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी कार्यकर्त्यांना लाठ्या-काठ्या उचलून शेतकऱ्यांना विरोध करायला सांगून प्रोत्साहन देणे अतिशय निंदनीय आहे. भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या अशा वक्तव्याचा निषेध करतो. तसेच मुख्यमंत्री खट्टर यांनी माफी मागावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 

दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही या वक्तव्यासंदर्भात टीकास्त्र सोडले आहे. राज्याचा मुख्यमंत्री हिंसाचाराला प्रोत्साहन देत असेल, कायदा-सुव्यवस्था समाप्त करण्याची गोष्ट करत असेल, तर संविधानानुसार शासन कसे चालणार, असा सवाल करत भाजप शेतकरी विरोधी असल्याचे यामुळे उघडकीस आले आहे. भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला गुरुमंत्र यशस्वी होणार नाही, या शब्दांत सुरजेवाला यांनी खट्टर सरकारवर निशाणा साधला आहे. 
 

Web Title: haryana cm manohar lal khattar controversial statement over farmers protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.