Haryana assembly elections 2019: 42% candidates crorepatis, 10% have criminal cases | Haryana assembly elections 2019: आखाड्यात ४२% उमेदवार कोट्यधीश; ११७ जणांवर गुन्हे 

Haryana assembly elections 2019: आखाड्यात ४२% उमेदवार कोट्यधीश; ११७ जणांवर गुन्हे 

नवी दिल्ली : हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या एकूण उमेदवारांपैकी ४२ टक्के उमेदवार कोट्यधीश असून, १० टक्के उमेदवारांवर फौजदारी गुन्हे आहेत. १,१३८ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केल्यानंतर असोसिएशन आॅफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार ४८१ उमेदवार कोट्यधीश आहेत, तर ११७ उमेदवारांवर गुन्हे आहेत.

२०१४ च्या तुलनेत गुन्ह्यांची नोंद असलेल्या उमेदवारांची संख्या ३ टक्के अधिक आहे. यावेळी हरयाणा विधानसभेची निवडणूक एकूण ७४ राजकीय पक्ष लढवीत आहेत. २०१४ मध्ये ४३ राजकीय पक्षांनी उमेदवार उतरविले होते. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी येत्या २१ आॅक्टोबर रोजी मतदान होत असून, ७४ राजकीय पक्षांचे एकूण १,१६९ उमेदवार नशीब अजमावत आहेत. २०१४ ची निवडणूक ४३ पक्षांनी एकमेकांविरुद्ध लढविली होती.

यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या कोट्यधीश ४८१ उमेदवारांची एकूण संपत्ती सरासरी ४ कोटी ३१ लाख रुपये आहे. याचाच अर्थ ४२ टक्के उमेदवारांनी आपली संपत्ती एक कोटीपेक्षा अधिक असल्याचे प्रतिज्ञापत्रात घोषित केले आहे. राजकीय पक्षनिहाय काँग्रेसचे ७९, भाजपचे ७९, जेजेपीचे ६२, आयएनएलडीचे ८० आणि बसपाचे ३४ उमेदवार कोट्यधीश आहेत.

गुन्हे असलेले ११७ उमेदवार
यावेळी निवडणूक लढविणांऱ्यापैकी १० टक्के म्हणजे ११७ उमेदवारांनी आपल्याविरुद्ध गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती दिली आहे. ७० उमेदवारांवर गंभीर गुन्हे आहेत. यात काँग्रेसचे २२, भाजपचे ४, जजपाचे १६, आयएनएलडीचे १२ आणि बसपाच्या २१ उमेदवारांचा समावेश आहे.

निरक्षर ते उच्चशिक्षित उमेदवार रिंगणात
निरक्षर ते उच्चशिक्षित उमेदवार निवडणूक लढवीत असून, ५७४ उमेदवार ५ वी आणि १२ वी उत्तीर्ण आहेत. ४८४ उमेदवार पदवीधर किंवा अधिक शिक्षित आहेत. ३५ उमेदवार पदविकाधारक असून, १९ उमेदवार साक्षर असून, २५ निरक्षर आहेत. उमेदवारांचे वयोमान २५ ते ८० वर्षांदरम्यान आहे.

बेरोजगारीवर भाजप गप्प का?
चंदीगड : बेरोजगारीसारख्या ज्वलंत मुद्यावर भाजप का गप्प आहे? असा सवाल जनता भाजपला विचारत आहे. जनतेने भाजपला यावेळी बाहेरचा रस्ता दाखविण्याचा चंग बांधला आहे, असा दावा हरयाणा प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष कुमारी शैलजा यांनी केला आहे.
खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार अनेक घोटाळ्यांत अडकले आहे. अनुच्छेद ३७० ला भाजप निवडणुकीत मोठा मुद्दा बनविला आहे. यावर त्या म्हणाल्या की, हा डाव त्यांच्यावर उलटेल. कारण बेरोजगारीसारख्या मुद्यांवर भाजप मूग गिळून का? असा सवाल जनता विचारत आहे. हरयाणात काँग्रेसचे सरकार येईल, अशी ठाम आशा आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Haryana assembly elections 2019: 42% candidates crorepatis, 10% have criminal cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.