गेल्या १३ वर्षांपासून कोमात असलेल्या आणि मृत्यूशी झुंज देणाऱ्या ३२ वर्षीय हरीश राणा यांच्या आयुष्याचा प्रवास आता एका अत्यंत भावूक वळणावर येऊन पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक आदेशानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्या 'इच्छा मृत्यू'ची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे. हरीश यांना आता वेंटिलेटरवरून हटवून सामान्य बेडवर हलवण्यात आले आहे.
काय आहे सध्याची स्थिती?
एम्समधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंटिलेटर काढल्यानंतर आता हरीश राणा यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी १० तज्ज्ञ डॉक्टरांचे एक विशेष मेडिकल बोर्ड नियुक्त करण्यात आले आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पोटातील अन्नाची नळी बंद करण्यात आली होती. आता त्यांना वेंटिलेटर आणि इतर लाईफ सपोर्ट सिस्टिमवरूनही दूर करण्यात आले आहे. मात्र, वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार त्यांना मेंदूसाठी आवश्यक असलेली काही औषधे अजूनही दिली जात आहेत.
रक्षाबंधनाचा तो काळा दिवस...
हरीश यांचा हा दुर्दैवी प्रवास २०१३ मध्ये सुरू झाला होता. चंदीगड युनिव्हर्सिटीतून बी.टेक करत असलेले हरीश रक्षाबंधाच्या दिवशी आपल्या बहिणीशी फोनवर बोलत होते. त्याच वेळी पीजीच्या चौथ्या मजल्यावरून पडून त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तेव्हापासून गेली १३ वर्षे ते हालचालही करू शकत नव्हते. त्यांचे हात-पाय पूर्णपणे निकामी झाले होते. कुटुंबाने शक्य ते सर्व उपचार केले, पण यश आले नाही. अखेर थकलेल्या कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि त्यांना इच्छा मृत्यूची परवानगी मिळाली.
कुटुंबाचे दररोज समुपदेशन
हा निर्णय कोणत्याही आई-वडिलांसाठी सोपा नसतो. आपल्या पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या दाढेत जाताना पाहणे असह्य असते. म्हणूनच एम्स प्रशासनाने हरीश यांच्या आई-वडिलांच्या राहण्याची तिथेच सोय केली आहे. हरीशची आई सतत त्याच्या उशाशी बसलेली असते. डॉक्टर दररोज आई-वडील आणि हरीशच्या भावाचे समुपदेशन करत आहेत, जेणेकरून या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी त्यांना मानसिक बळ मिळेल.
गाझियाबादमध्ये हळहळ
गाझियाबाद येथील राहत्या घरातून जेव्हा एम्सचे पथक हरीश यांना घेऊन निघाले, तेव्हा संपूर्ण परिसर भावूक झाला होता. १३ वर्षे ज्या मुलाची सेवा केली, त्याला अखेरचा निरोप देताना कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते.
Web Summary : Harish Rana, in coma for 13 years, is now off ventilator after court order. His condition is stable with medication and monitoring. Family receives counseling as end-of-life process begins.
Web Summary : 13 वर्षों से कोमा में रहे हरीश राणा को अदालत के आदेश के बाद वेंटिलेटर से हटाया गया। दवाइयों और निगरानी से उनकी हालत स्थिर है। परिवार को परामर्श मिल रहा है क्योंकि जीवन के अंत की प्रक्रिया शुरू हो गई है।