एकेकाळी गाजलेल्या पटेल आरक्षण आंदोलनातील युवा नेते आणि आता गुजरातमधील विरमगाम विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार हार्दिक पटेल यांना पत्र लिहून दिलेल्या इशाऱ्यामुळे गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे. हार्दिक पटेल यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये सात महिन्यांपूर्वी भूमिपूजन झालेल्या विकासकामांचं एक टक्काही काम झालं नसल्याची तक्रार केली आहे. तसेच यामुळे लोक नाराज असून, लोकप्रतिनिधीमधून या लोकांसोबत आपल्याला उपोषण आंदोलनामध्ये सहभागी व्हावे लागेल, असा इशारा दिला आहे.
हार्दिक पटेल यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विरमगाम शहरामध्ये ओव्हरफ्लो असलेली सांडपाण्याची पाईप लाईन आमि लोकांच्या घरामध्ये येत असलेल्या दूषित पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे. त्यांनी भाजपाशासित विरमगाम नगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच उपोषणामध्ये सहभागी होण्याची इशारा दिला आहे.
पटेल आंदोलनामुळे चर्चे आतलेल्या हार्दिक पटेल यांनी याआधीही जनतेच्या प्रश्नांवरून आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. दरम्यान, नगरपालिकेकडून जी कामं होणं अपेक्षित आहे ती कामं होत नाहीत, असा आरोप हार्दिक पटेल यांनी केला आहे. विकासकामांचं टेंडर निघालेलं आहे, मात्र ठेकेदाराकडून काम केलं जात नाही आहे, अशी तक्रार त्यांनी केली आहे.
हार्दिक पटेल यांनी पुढे लिहिले की, जर लोकांच्या समस्यांचं समाधान वेळेवर केलं गेलं नाही, तर मला लोकप्रतिनिधी म्हणून उपोषण आंदोलनामध्ये सहभागी होऊन जनतेचा विश्वास कायम ठेवावा लागेल.