हापूसची निम्मी निर्यात आखाती देशांमध्ये; युद्ध लांबल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 11:57 IST2026-03-11T11:56:29+5:302026-03-11T11:57:19+5:30
आखाती देशांमधील युद्ध लांबल्यास त्याचा फटका आंबा निर्यातीवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हापूसची निम्मी निर्यात आखाती देशांमध्ये; युद्ध लांबल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता
नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : आखाती देशांमधील युद्ध लांबल्यास त्याचा फटका आंबा निर्यातीवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूण निर्यातीपैकी जवळपास ५० टक्के निर्यात फक्त नऊ आखाती देशांमध्ये होत असते. यावर्षी हंगाम उशिरा सुरू होत असल्यामुळे अद्याप निर्यात सुरू झालेली नाही. युद्ध थांबले नाही तर निर्यात घटून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतीय आंब्याला जवळपास ५८ देशांमधून मागणी असते. २०२५ मध्ये ३३,३३० टन आंबा निर्यात झाला होता. या व्यापारातून ४९६ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यामध्ये ४६ टक्के वाटा सहा आखाती देशांचा आहे.
आंबा निर्यात अद्याप सुरू झालेली नाही. मार्च अखेरीस निर्यात सुरू होईल. आखाती देशातील युद्ध लवकर संपले नाही तर त्याचा फटका निर्यातीला बसण्याची शक्यता आहे.
संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट
आखाती देशांमध्ये हापूसची झाली होती २२९ कोटींची निर्यात
आखाती देशांमध्ये गतवर्षी १६,१५६ टन निर्यात झाली होती. या माध्यमातून २२९ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. एकूण विदेशी व्यापारापैकी ३४ टक्के वाटा एकट्या संयुक्त अरब अमिरातीचा आहे. आंबा निर्यातीमुळे शेतकऱ्यांना थेट जागतिक बाजारपेठ उपलब्ध होते. याशिवाय स्थानिक बाजारपेठेमध्येही भाव वाढण्यास मदत होत असते.
यंदा आंब्याचे उत्पादन कमी झाले आहे. मार्चचा दुसरा आठवडा सुरू झाल्यानंतरही अद्याप कोकणच्या हापूसची अपेक्षित आवक सुरू झालेली नाही. हवामान बदलाच्या संकटामध्ये आता युद्धाचीही भर पडली आहे. युद्ध लवकर संपले नाही तर त्याचा परिणाम निर्यातीवर होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. निर्यातीसाठी पर्यायी देशांशी चाचपणी करावी लागण्याची शक्यता आहे.
२०२५ मध्ये आखाती देशांत निर्यात
देश निर्यात (टन) उलाढाल (कोटींत)
यूएई १२९११ १७०
कुवेत ११५६ २६
कतार १३३९ २०.८७
बहरिन ३८८ ५.७६
सौदी अरेबिया ३३७ ५.०५
इराण २२.९८ ०.४८