व्हाईस रेकॉर्डिंगपासून पळतोय हनीसिंग
By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:07+5:302015-02-16T23:55:07+5:30
हायकोर्ट : राज्य शासनाचे प्रतिज्ञापत्र सादर

व्हाईस रेकॉर्डिंगपासून पळतोय हनीसिंग
ह यकोर्ट : राज्य शासनाचे प्रतिज्ञापत्र सादरनागपूर : अश्लील गाणी गाण्याचा आरोप असलेले पंजाबी रॅप गायक हिरदेशसिंग सरबजितसिंग ऊर्फ यो यो हनीसिंग व आदित्य पी.पी. सिंग ऊर्फ बादशाह हे व्हाईस रेकॉर्डिंगपासून पळत असल्याचा आरोप राज्य शासनाने केला आहे.यासंदर्भात शासनाने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर केले. हनीसिंग व बादशाहच्या नावाने इंटरनेटवर उपलब्ध असलेली अश्लील गाणी त्यांनी स्वत:च गायली आहेत की नाही, हे तपासण्यासाठी पोलिसांना दोघांचेही व्हाईस रेकॉर्डिंग करायचे आहे. यासाठी दोघांनाही पाचपावली पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. व्हाईस रेकॉर्डिंग न्यायसहायक प्रयोगशाळेत पाठवून प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचा पोलिसांचा विचार आहे. परंतु दोघेही सहकार्य करीत नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय दोघांचे भारतातील पत्तेही बनावट असल्याचे सांगण्यात आले आहे. व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंग व बादशाहविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी दोघांनीही सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. २९ जानेवारी रोजी सत्र न्यायालयाने दोघांनाही अर्जांवरील प्रत्येक सुनावणीला व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची त्यांची विनंती आहे. सत्र न्यायालयाच्या आदेशावर उच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती आहे. हनीसिंगतर्फे ॲड. अतुल पांडे, तर शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मुकुंद एकरे यांनी बाजू मांडली.