शपथविधीला एकत्र आलो म्हणजे एकत्र लढू असं नाही- देवेगौडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 13:43 IST2018-06-29T13:42:25+5:302018-06-29T13:43:03+5:30
नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना देवेगौडा यांनी काँग्रेसने आम्हाला गृहित धरु नये असे सांगत आताच 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील आपल्या भूमिकेचे संकेत दिले आहेत.

शपथविधीला एकत्र आलो म्हणजे एकत्र लढू असं नाही- देवेगौडा
बंगळुरू- कर्नाटकातील जनता दल धर्मनिरपेक्ष आणि काँग्रेस यांच्या सरकारमध्ये पहिल्या महिन्यापासूनच कुरबुरी सुरु झाल्या आहेत. मंत्रिमंडळात खातेवाटपानंतर आता अर्थसंकल्पावरुन दोन्ही पक्षांमध्ये ओढाताण सुरु झाली आहे. सिद्धरामय्या आणि मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी यापुर्वीच एकमेकांच्या भूमिकांविरोधात वक्तव्ये केली आहेत. त्यातच माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी विरोधकांच्या एकीवर नवे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. कुमारस्वामींच्या मे महिन्यातील शपथविधीला भाजपाविरोधी पक्ष एकत्र आले म्हणजे ते एकत्र निवडणूक लढतील असे नाही असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले आहे.
There goes Opposition unity: Former Prime Minister H D Devegowda said all parties who attended swearing in of Karnataka Chief Minister @hd_kumaraswamy might not fight Lok Sabha elections together: according to PTI
— Sreeparna (@sreeparna_c) June 28, 2018
नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना देवेगौडा यांनी काँग्रेसने आम्हाला गृहित धरु नये असे सांगत आताच 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील आपल्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. विरोधकांची एकजूट करुन भारतीय जनता पार्टीला सत्तेत येण्यापासून रोखायचे या काँग्रेसच्या स्वप्नाला धक्के देण्याचा प्रयत्न देवेगौडा यांनी सुरु केले आहेत.
''राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नसलेल्या सहा पक्षांनी कुमारस्वामींच्या शपथविधीला हजेरी लावली होती. याचा अर्थ 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सर्व राज्यांमध्ये त्यांनी एकत्र लढावे असे आवश्यक नाही'', असे मत देवेगौडा यांनी मांडले आहे. मे महिन्यात बंगळुरू येथे कुमारस्वामी यांचा मुख्यमंत्रीपदासाठी शपथविधी झाला होता. त्यावेळेस काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, बहुजन समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, मार्क्सवादी कम्युविस्ट पार्टी, तेलुगू देसम पार्टी असे पक्ष हजर होते.
ते पुढे म्हणाले, ''उत्तर प्रदेशात लोकसभेसाठी समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष यांनी 40-40 जागा लढवाव्यात का यावर अजून त्या दोन्ही पक्षांमध्ये चर्चा आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस एकत्र लढणे ठरत आहे. मात्र महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, आंध्र प्रदेशात तेलगू देसम पक्ष, तेलंगणात तेलंगण राष्ट्र समिती यांनी अद्याप काहीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. फक्त कर्नाटकात आम्ही काँग्रेसबरोबर मतभेद असूनही एकत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे, अर्थात त्यावर काहीही चर्चा झालेली नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि जनता दल सेक्युलरचे कुमारस्वामी दोघे याचा निर्णय घेतील. येत्या काळात मी रालोआमध्ये नसलेल्या काही नेत्यांची भेट घेणार आहे.''