मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 11:09 IST2025-11-03T11:08:57+5:302025-11-03T11:09:56+5:30
मध्य प्रदेशातील गुनामध्ये सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर झाल्याने रुग्णाला जीव गमवावा लागला.

फोटो - आजतक
मध्य प्रदेशातील गुनामध्ये सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर झाल्याने रुग्णाला जीव गमवावा लागला. हाय ब्ल़ड प्रेशर आणि छातीत दुखू लागल्याने जगदीश ओझा (६५) यांना म्याना आरोग्य केंद्रातून जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलं, परंतु राष्ट्रीय महामार्गावर सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर झाला.
टायर पंक्चर झाल्यानंतर, रुग्णवाहिका सुमारे एक तास रस्त्याच्या कडेला उभी राहिली. या काळात, रुग्णाची प्रकृती आणखी बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीचा जीव गेला आहे. रुग्णवाहिकेच्या चालकाने सांगितलं की, तो पहिल्यांदाच ही रुग्णवाहिका चालवत होता. स्टेपनी आहे की नाही हे त्याला माहीत नव्हतं. त्याला फक्त रुग्णाला म्यानाहून जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितंल होतं. मात्र रस्त्यात रुग्णवाहिका पंक्चर झाली.
जगदीश ओझा यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडिलांना छातीत दुखत होतं. त्यांची प्रकृती खालावत होती, म्हणून रुग्णवाहिका बोलवण्यात आली. सुमारे ४५ मिनिटांनी रुग्णवाहिका म्याना येथे आली. त्यांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. १० किलोमीटरनंतर रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर झाला. दुसऱ्या वाहनाची व्यवस्था करण्यात विलंब झाला. वडिलांना रुग्णालयात नेलं असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यापेक्षा मोठा निष्काळजीपणा कोणता असू शकतो? असा सवालही विचारला आहे.
जगदीश ओझा यांच्या मृत्यूमुळे संतप्त झालेले काँग्रेस आमदार ऋषी अग्रवाल यांनी प्रश्न उपस्थित केले आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधला आणि आरोग्य विभागाला जबाबदार धरत कठोर कारवाईची मागणी केली. आमदाराने आरोप केला की राज्यात रुग्णवाहिकांच्या नावाखाली ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त भ्रष्टाचार झाला आहे, ज्याची चौकशी झाली पाहिजे. महिनाभरापूर्वी सरकारी रुग्णवाहिकेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एका मुलीचा मृत्यू झाला होता.