मंदिरात लाऊड स्पीकरवर आरती लावल्यानं तरुणाला बेदम मारहाण; जखमी तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 15:42 IST2022-05-06T15:41:16+5:302022-05-06T15:42:33+5:30
मंदिरातील लाऊड स्पीकरवर आरती लावल्यानं दोन भावांना मारहाण; एकाचा मृत्यू; गुजरातमधील धक्कादायक घटना

मंदिरात लाऊड स्पीकरवर आरती लावल्यानं तरुणाला बेदम मारहाण; जखमी तरुणाचा मृत्यू
मेहसाणा: भोंग्यांवरून राज्यातलं वातावरण तापलं आहे. त्याचे पडसाद इतर राज्यांमध्येही उमटू लागले आहेत. उत्तर प्रदेशातील शेकडो प्रार्थनास्थळांवरील भोंगे उतरवण्यात आले आहेत. गुजरातच्या मेहसाणात लाऊड स्पीकरवरून झालेल्या वादात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. मंदिरात मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर आरती लावल्यानं हा प्रकार घडला. मंदिरात असलेल्या लाऊडस्पीकरवरून होणाऱ्या आवाजावरून गुजरातमध्ये दुसऱ्यांदा हिंसक घटना घडली आहे.
मेहसाणा जिल्ह्यातील लंघनाजमध्ये तरुणाची हत्या झाली. बेदम मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू झाला. जोतना तालुक्यातील लक्ष्मीपुरा गावात बुधवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास हा प्रकार घडला. जसवंतजी ठाकोर असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. तो मजुरी करून उदरनिर्वाह करायचा. जसवंतचा मोठा भाऊ अजित ठाकोर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोघे घराशेजारीच असलेल्या मेल्डी माता मंदिरात आरती करत होते. लाऊडस्पीकरवर आरती सुरू होती.
आरती सुरू असताना सदाजी ठाकोर, विष्णूजी ठाकोर, बाबूजी ठाकोर, जयंती ठाकोर, जावन ठाकोर आणि विनुजी ठाकोर तिथे पोहोचले. इतक्या मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर आरती का लावली आहे, अशी विचारणा त्यांनी केली. आम्ही आरती करत आहोत, असं उत्तर अजित ठाकोर यांनी दिलं. त्यानंतर सदाजी ठाकोर यांनी शिवीगाळ सुरू केली. अजित ठाकोर यांनी विरोध करताच सदाजी यांनी त्यांच्या निकटवर्तीयांना बोलावलं. त्या सगळ्यांनी जसवंत आणि अजित यांच्यावर काठ्यांनी हल्ला केला.
अचानक झालेल्या हल्ल्यात दोघे भाऊ जखमी झाले. त्यांना गंभीर अवस्थेत मेहसाणातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे जसवंतनं अखेरचा श्वास घेतला. अजित यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर अजित यांच्यावर उपचार सुरू आहेत.