Gujarat Results 2022: देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतल्या तिथे कोण जिंकतंय?; बघा, 'त्या' सात जागांचा निकाल

By महेश गलांडे | Published: December 8, 2022 12:48 PM2022-12-08T12:48:16+5:302022-12-08T12:49:43+5:30

देवेंद्र फडणवीस यांनी गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी अहमदाबाद, सुरत, सांबरकांठा जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात प्रचाररॅली केली.

Gujarat Results 2022: What about the 7 candidates that Devendra Fadnavis held rally with? Who is leading in Gujarat bjp or congress | Gujarat Results 2022: देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतल्या तिथे कोण जिंकतंय?; बघा, 'त्या' सात जागांचा निकाल

Gujarat Results 2022: देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतल्या तिथे कोण जिंकतंय?; बघा, 'त्या' सात जागांचा निकाल

googlenewsNext

महेश गलांडे

गुजरातमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल आता स्पष्ट झाल्याचं दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात भाजपने मोठं यश मिळवलं असून यंदा रेकॉर्डब्रेक विजय भाजपला मिळणार असल्याचं दिसत आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहासह भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळेच, या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे यंदा प्रथमच महाराष्ट्रातील गुजराती मतदारांनाही मतदानादिवशी पगारी सुट्टी देण्यात आली होती. तर, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपचे दिग्गज देवेंद्र फडणवीस हेही गुजरातच्या मैदानात प्रचारासाठी उतरल्याचं पाहायला मिळालं. आता, गुजरातमध्ये फडणवीसांनी ज्या मतदारसंघात सभा घेतल्या, तिथेही भाजपला घवघवीत यश मिळत आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी अहमदाबाद, सुरत, सांबरकांठा, भावनगर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात प्रचाररॅली केली. यावेळी, काँग्रेसवर निशाणा साधत, आम आदमी पक्ष म्हणजे लग्नात नायायला आलेले वराती असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात यंदा भाजपला रेकॉर्डब्रेक विजय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार, गेल्या २७ वर्षातील सर्वात मोठा विजय यंदा भाजपला मिळत असल्याचं दिसून येत आहे. यापूर्वी २००२ मध्ये भाजपला येथे १२७ जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर, आता जवळपास १५० जागांवर विजय मिळत असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.  

साबरकांठा जिल्ह्यातील प्रांतीज आरवली विधानसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेतली होती. यावेळी, प्रंतीज विधानसभा मतदारसंघाशी आपलं जुनंच नातं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. कारण, २०१७ च्या निवडणूक प्रचारासाठी ते गुजरातला गेले होते, तेव्हा जयसिंग भाई चौहान हे उमेदवार होते. त्यावेळी, ते १७ दिवस येथे प्रचारात व्यस्त होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. तसेच, प्रांतीज मतदारसंघातील उमेदवार गजेंद्रसिंह परमार यांना विजयी करण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केलं होतं. गजेंद्रसिंह यांचा विजय निश्चित मानला जात असून दुपारी १२ वाजेपर्यंत मिळालेल्या मतानुसार त्यांनी २५ हजार मतांचा लीड घेतला आहे. 

भावनगरच्या तळाजा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार गौतम चौहान आणि गारियाधारचे उमेदवार केशुभाई नाकराणी यांच्यासाठी फडणवीसांनी प्रचारसभा घेतली होती. महुआ विधानसभा मतदारसंघातील शिवाभाई गोहिल यांच्या प्रचारासाठीही त्यांनी सभा घेत संबोधित केले होते. त्यापैकी, तळाजा मतदारसंघातील गौतम चौहान हे दुपारी १२ वाजेपर्यंत ३० हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर. गारियाधरचे केशुभाई नाकराणी हे पिछाडीवर असून आम आदमी पक्षाचे सुधीरभाई वागणी हे १४ हजार मतांनी आघाडीवर आहेत. महुआचे भाजप उमेदवार शिवाभाई गोहिल हेही २२ हजार मतांनी आघाडीवर आहेत. 

मोरडंगुरी, बायड विधानसभा मतदारसंघातही फडणवीसांनी जाहीर सभा घेतली होती. भाजप उमेदवार भिकीबेन परमार यांना निवडून देण्याचं आवाहन फडणवीसांनी केलं होतं. निकालदिवशी भिकीबेन यांनीही मोठा लीड घेतला असून दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांनी २३ हजारांची आघाडी घेतल्याने त्यांचाही विजय निश्चित मानला जात आहे. 

सुरत येथेही जाऊन फडणवीसांनी जाहीर सभा घेत भाजपला जिंकवण्याचं आवाहन केलं होतं. सुरतच्या लिंबायत येथील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार संगीताबेन पाटील यांच्या मतदासंघात फडणवीसांनी भाषण केले होते. येथील भाजप उमेदवार संगीताबेन पाटील यांना दुपारी १२ वाजेपर्यंत २ हजारांची आघाडी असून काँग्रेस उमेदवार गोपल पाटील यांचं त्यांना आवाहन आहे. येथे अटीतटीची लढाई दिसून येत आहे. 

अहमदाबादच्या मणिनगर विधानसभा मतदारसंघात फडणवीसांनी तिसरी जाहीर सभा केली होती. भाजप उमेदवार अमोलभाई भट्ट यांच्यासाठी तेथील जनतेला संबोधित केले होते. येथील निवडणुकीत अमोल भट्ट हे दुपारी १२ वाजेपर्यंत २८ हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे, त्यांचाही विजय निश्चित मानला जातो. दरम्यान, फडणवीसांनी प्रचारावेळी येथील मराठी बांधवांनाही भेट दिली होती. यावेळी, यंदा भाजपला रेकॉर्डब्रेक विजय मिळवून द्या, असे आवाहनही फडणवीसांनी गुजरातमधील जनतेला केले होते. मणीनगर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधानसभा क्षेत्र होते, येथूनच मोदींनी विधानसभा निवडणूक जिंकली होती. 

प्रांतीज, तळाजा, गारियाधार, महुआ, बायड, लिंबायत, मणिनगर या ७ मतदारसंघातील उमेदवारांसाठी फडणवीसांनी जाहीर सभा घेतल्या होत्या. त्यापैकी, ५ उमेदवारांचा विजय निश्चित मानला जातो. तर, गारियाधरचे केशुभाई नाकराणी हे पिछाडीवर असून तिथे आम आदमी पक्षाचे उमेदवार सुधीरभाई वागणी आघाडीवर आहेत. तर, लिंबायत येथील संगिताबेन पाटील आणि काँग्रेसच्या गोपाल पाटील यांच्यात चांगली लढत आहे. मात्र, येथेही भाजप उमेदवारच आघाडीवर आहेत. त्यामुळे, फडणवीसांनी ७ उमेदवारांच्या मतदारसंघात प्रचार केला, त्यापैकी ६ जण विजयाच्या वाटेवर असून १ पिछाडीवर आहे. 

 

 

Web Title: Gujarat Results 2022: What about the 7 candidates that Devendra Fadnavis held rally with? Who is leading in Gujarat bjp or congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.