गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:19 IST2025-10-14T15:17:10+5:302025-10-14T15:19:19+5:30
Gujarat Politics: ८ ते १० मंत्र्यांचा राजीनामा; नवी चेहऱ्यांना मिळणार संधी!

गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
Gujarat Politics: गुजरातच्या राजकारणात पुढील काही दिवसांत मोठा बदल पाहायला मिळू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळात उद्या किंवा परवा मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. या फेरबदलात अनेक नव्या चेहऱ्यांना स्थान मिळणार असून, काही विद्यमान मंत्र्यांना पदोन्नती दिली जाऊ शकते. नवीन मंत्र्यांमध्ये क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी आणि जामनगर उत्तर मतदारसंघाच्या आमदार रिबावा यांचाही समावेश असेल.
2022 नंतरचा पहिला फेरबदल
2022 च्या विधानसभा निवडणुकीनंतर गुजरात मंत्रिमंडळात हा पहिलाच मोठा फेरबदल असणार आहे. या बदलात रिवाबा जडेजा, अर्जुन मोडवाडिया, जितू वाघाणी आणि हर्ष सांघवी यांसारख्या महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश होऊ शकतो. हर्ष सांघवी यांना कॅबिनेट मंत्रीपदावर पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या मते, या फेरबदलात ८ ते १० मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो.
रिवाबा जडेजा यांच्यावर सर्वांचे लक्ष
या फेरबदलात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे रिवाबा जडेजा. त्या २०२२ मध्ये जामनगर उत्तर या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या होत्या. रिवाबा महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विषयांवर त्यांच्या थेट आणि स्पष्ट भूमिकेसाठी ओळखल्या जातात. त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास भाजप महिला मतदार आणि तरुण वर्गात संदेश देण्याचा प्रयत्न करेल, अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
2027 च्या निवडणुकांसाठी तयारी
राज्य सरकारचा हा फेरबदल २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना लक्षात घेऊन करण्यात येणार असल्याचे समजते. सध्या गुजरातच्या मंत्रिमंडळात १७ मंत्री आहेत. नियमानुसार, जास्तीत जास्त २७ मंत्री असू शकतात. १० मंत्रीपदे रिक्त असून, याच ठिकाणी नव्या चेहऱ्यांना स्थान मिळेल, अशी चर्चा आहे. काही जागा मात्र पुढील राजकीय संतुलनासाठी रिक्त ठेवण्यात येऊ शकतात.