Gujarat News: गुजरातच्या अरवल्ली जिल्ह्यात सोमवारी (17 नोव्हेंबर) सायंकाळी घडलेल्या भीषण दुर्घटनेने राज्याला हादरवून सोडले आहे. मोडासा येथील राणासैयद चौकाजवळ धावत्या अॅम्बुलन्सला अचानक भीषण आग लागली. काही क्षणातच आगीने पूर्ण वाहनाला वेढा दिला. या घटनेत चार जणांची होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये डॉक्टर, नर्स, नवजात बालक आणि त्याच्या वडिलांचा समावेश आहे. चालक आणि बालकाच्या एका नातेवाइकाला मात्र वेळेवर बाहेर काढल्याने ते बचावले.
उपचारासाठी नेत असताना आग
सविस्तर माहिती अशी की, ऑरेंज हॉस्पिटलची ही अॅम्बुलन्स एका दिवसाच्या नवजात बालकाला प्रसवानंतर पुढील उपचारांसाठी अहमदाबाद येथे घेऊन जात होती. मोडासा शहरातून जात असताना वाहनाच्या मागील बाजूला अचानक आग लागली. काही सेकंदांतच अॅम्बुलन्सच्या मागील बाजुला आगीने वेढले, ज्यामुळे डॉक्टर, नर्स, नवजात बालक आणि त्याच्या वडिलांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. चालक आणि नातेवाईक मात्र पुढील बाजूने उडी मारुन बाहेर पडले.
स्थानिकांची धावपळ
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ मोडासा नगरपालिका अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाने शर्तीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. स्थानिक पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेचा CCTV फुटेजही समोर आला आहे, ज्यात पेट्रोल पंपाजवळ धगधगत असलेली अॅम्बुलन्स स्पष्ट दिसते. मृतांमध्ये नर्स भाविकाबेन रमणभाई मनात (वय 22 वर्षे) (मुळगाव: चिठोडा, हिम्मतनगर) आणि डॉ. राज शांतिलाल रेंटिया (वय 35 वर्षे) – डॉक्टर (मुळगाव: चिठोडा, हिम्मतनगर) यांच्यासह नवजात बालक आणि त्याच्या वडिलांचा समावेश आहे.
आग लागण्यामागे तांत्रिक बिघाड? तपास सुरू
पोलीसांनी या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार अॅम्बुलन्समध्ये झालेला शॉर्ट सर्किट किंवा इतर तांत्रिक बिघाड हा आग लागण्याचे संभवित कारण मानले जात आहे. मात्र अधिकृत कारण तपासानंतरच स्पष्ट होईल. मोडासा सारख्या शांत शहरात झालेल्या या दुर्घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. स्थानिकांनी अॅम्बुलन्ससारख्या जीवनरक्षक सेवांच्या सुरक्षिततेवरही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
Web Summary : A horrific ambulance fire in Gujarat killed a newborn, doctor, nurse, and the baby's father. A technical fault is suspected as the cause. Driver and relative survived.
Web Summary : गुजरात में एक भीषण एम्बुलेंस आग में एक नवजात, डॉक्टर, नर्स और बच्चे के पिता की मौत हो गई। तकनीकी खराबी का कारण संदेह है। ड्राइवर और रिश्तेदार बच गए।