ठाकरे सरकारनं बुलेट ट्रेन प्रकल्प रोखला; मोदी सरकारनं वेगळा मार्ग काढला; 'प्लान बी' तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 09:03 IST2021-03-06T08:29:27+5:302021-03-06T09:03:00+5:30
Mumbai - Ahmedabad Bullet Train project: महाराष्ट्रातील जमीन अधिग्रहणाचा वेग कमी; नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड वेगळ्या विचारात

ठाकरे सरकारनं बुलेट ट्रेन प्रकल्प रोखला; मोदी सरकारनं वेगळा मार्ग काढला; 'प्लान बी' तयार
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट असलेली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai - Ahmedabad Bullet Train project) धावण्यास उशीर होणार आहे. कोरोनाचं संकट आणि ठाकरे सरकारनं प्रकल्पाबद्दल घेतलेली भूमिका यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाचा वेग कमी झाला आहे. मात्र ठरल्याप्रमाणे बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) प्रयत्नशील आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचं अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. महाराष्ट्रात अधिग्रहणाचा वेग अतिशय कमी आहे. पुढील ३ महिन्यांत अपेक्षित जमिनीचं अधिग्रहण न झाल्यास बुलेट ट्रेनची गुजरातमधील सेवा आधी सुरू होईल.
बुलेट ट्रेन कधी सुरू होणार? रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी दिले 'हे' उत्तर; म्हणाले...
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पंतप्रधान मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पण राज्यात ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर या प्रकल्पाचा वेग मंदावला आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या अधिग्रहणाचा वेग मंदावला आहे. पुढील तीन महिन्यांत अधिग्रहणानं वेग न घेतल्यास आधी गुजरातच्या हद्दीत येणारी बुलेट ट्रेन धावेल, अशी माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं दिली आहे.
समृद्धी महामार्गालगत नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचा प्रस्ताव
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनलाठी २०२३ ची डेडलाईन ठेवण्यात आली होती. पण कोरोनामुळे वर्ष वाया गेल्यानं आता हा प्रकल्प पूर्ण होण्यास २०२४ वर्ष उजाडेल, अशी माहिती माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी दिली. 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ५०८ किलोमीटर लांबीचा आहे. त्यापैकी ३५२ किलोमीटर प्रकल्प गुजरातमध्ये आहे. यातल्या ९५ टक्के जमिनीचं अधिग्रहण पूर्ण झालं आहे. पण महाराष्ट्रातल्या १५६ किलोमीटरपैकी केवळ २३ टक्के जमिनीचं अधिग्रहण पूर्ण करण्यात यश आलं आहे,' अशी आकडेवारी खरे यांनी दिली.
'गुजरातमधील उर्वरित ५ टक्के जमीन जूनच्या मध्यापर्यंत अधिगृहित केली जाईल. पुढील तीन महिन्यांत ७० ते ८० टक्के जमीन अधिगृहित झाल्यास नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला पूर्ण प्रकल्प एकाचवेळी सुरू करता येईल. पण महाराष्ट्रातील जमिनीचं अधिग्रहण करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे आता जपानी कंपनीसोबत बोलणी सुरू आहे. महाराष्ट्रातील जमीन अधिग्रहण रखडल्यानं केवळ गुजरातमध्ये बुलेट ट्रेन सुरू करण्याचा नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचा मानस आहे', असं खरे यांनी सांगितलं. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर एकूण १२ स्थानकं असणार आहेत. यातील ८ स्थानकं गुजरात, तर ४ स्थानकं महाराष्ट्रात असतील.