भाजपाचे 'मिशन इलेक्शन' जोरात; गुजरातमध्ये CNG सात रुपयांनी स्वस्त, PNG दरातही कपात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 17:17 IST2022-10-17T17:16:01+5:302022-10-17T17:17:44+5:30
Gujarat Government : पीएनजी आणि सीएनजीच्या किमतीत ग्राहकांना 6 ते 7 रुपये किलोचा फायदा मिळणार आहे.

भाजपाचे 'मिशन इलेक्शन' जोरात; गुजरातमध्ये CNG सात रुपयांनी स्वस्त, PNG दरातही कपात
गुजरात निवडणुकीपूर्वी भूपेंद्र पटेल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गुजरात सरकारने राज्यातील सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) किमती कमी करण्यासाठी 10 टक्के व्हॅट (VAT) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा थेट फायदा 14 लाख सीएनजी वाहन चालकांना होणार आहे. याशिवाय, पीएनजी आणि सीएनजीच्या किमतीत ग्राहकांना 6 ते 7 रुपये किलोचा फायदा मिळणार आहे.
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 2 सिलिंडर मोफत
देशात सतत वाढत असलेल्या गॅसच्या किमतींमध्ये गुजरात सरकारच्या या निर्णयामुळे जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय, भूपेंद्र पटेल सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठीही निर्णय घेतला आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात 2 सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
आयुष्मान कार्डचे वितरण
गुजरातमध्ये वर्षअखेर विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापूर्वी भाजपा सरकारने जनतेला खूश करण्यासाठी अनेक गिफ्ट्स दिले आहे. आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना - मुख्यमंत्री अमृतम आयुष्मान कार्डचे वितरण देखील सुरू करतील. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) ही माहिती दिली. या योजनेमुळे राज्यातील आर्थिक दुर्बल रुग्णांना मोठी भेट मिळणार असून, त्यांना उपचाराच्या अनेक सुविधा मिळणार आहेत.
निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी
विशेष म्हणजे गुजरातमधील सर्व राजकीय पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसशिवाय आम आदमी पक्षही जोरदारपणे लढणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापासून ते सर्व पक्षाचे नेते सातत्याने गुजरात दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे सर्व बडे नेते सातत्याने गुजरात दौऱ्यावर आहेत.