Gujarat Floods : पावसाने झोडपलं, आता घोंघावतंय चक्रीवादळाचं संकट; गुजरातवर निसर्गाचा 'ट्रिपल अटॅक'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 10:01 IST2024-08-30T09:56:25+5:302024-08-30T10:01:25+5:30
Gujarat Floods : गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. अहमदाबाद ते वडोदरा आणि कच्छ ते द्वारका हे रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

Gujarat Floods : पावसाने झोडपलं, आता घोंघावतंय चक्रीवादळाचं संकट; गुजरातवर निसर्गाचा 'ट्रिपल अटॅक'
गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. अहमदाबाद ते वडोदरा आणि कच्छ ते द्वारका हे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सर्वाधिक प्रभावित क्षेत्र वडोदरा आहे, जेथे अनेक भागात पूर आला आहे. याच दरम्यान, निसर्गाचा आणखी एक अटॅक आता गुजरातवर होणार आहे. कच्छवर चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. चक्रीवादळापासून लोकांना वाचवण्याच्या सूचना मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिल्या आहेत.
कच्छ जिल्ह्यात चक्रीवादळाचा धोका आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या २४ तासांत चक्रीवादळ कच्छला धडकणार आहे. अहमदाबादसह राज्यभर जोरदार वारे वाहतील. मुसळधार पाऊस आणि पुराचा फटका बसलेल्या कच्छमध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळ येत्या काही तासांत कच्छला धडकू शकते. दरम्यान, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल गुरुवारी रात्री वडोदराहून गांधीनगर स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये पोहोचले.
मुख्यमंत्र्यांनी कच्छच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून येणाऱ्या चक्रीवादळासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेतला. या आपत्तीतून लोकांना वाचवण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी तातडीने लोकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लोकांना बाहेर काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. गुजरातमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
हवामान विभागाने मच्छिमारांना पुढील दोन-तीन दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. पावसामुळे राज्यातील १४० जलाशय, धरणे आणि २४ नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. एनडीआरएफ, पोलीस आणि पालिका यांचे पथक सातत्याने बचाव कार्यात गुंतले आहे. गेल्या चार दिवसांत, गुजरातमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे सुमारे १७,८०० लोकांना पूरग्रस्त भागातून बाहरे काढण्यात आले आहे.