Vijay Rupani Resigns: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 15:22 IST2021-09-11T15:21:37+5:302021-09-11T15:22:33+5:30
Gujarat Chief Minister Vijay Rupani resigns: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

Vijay Rupani Resigns: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा!
Gujarat Chief Minister Vijay Rupani resigns: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. खुद्द विजय रुपाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. गुजरातच्या जनतेनं आजवर दाखवलेल्या विश्वासाचे आणि भाजपाचे आभार व्यक्त करतो. माझ्या राजीनाम्यामुळे पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी व जबाबदारी मिळेल, असं रुपाणी यांनी यावेळी म्हटलं आहे.
Gujarat Chief Minister Vijay Rupani resigns pic.twitter.com/J8hl8GCHui
— ANI (@ANI) September 11, 2021
विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विजय रुपाणी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आजवर केलेल्या मार्गदर्शनाबाबत आभार व्यक्त केले. तसेच जनतेनं आजवर दिलेल्या प्रेमाचा कायमस्वरुपी ऋणी राहीन असंही रुपाणी म्हणाले. कोविड काळात माझ्या नेतृत्त्वात आम्ही राज्यात दिवसरात्र काम करुन नागरिकांची सेवा केली याचं समाधान असल्याचंही ते म्हणाले. यापुढील काळात पक्षाच्या कामात स्वत:ला व्यग्र ठेवण्याची इच्छाही रुपाणी यांनी बोलून दाखवली आहे.
विजय रुपाणी यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला. त्यानंतर रुपाणी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत त्यांना आजवर मिळालेल्या सहकार्याबाबत सर्वांचे आभार व्यक्त केले. राज्यपालांची भेट घेण्यासाठी विजय रुपाणी यांच्यासोबत उपमुख्यमंत्री नितीन पटेल देखील उपस्थित होते. गुजरातमध्ये डिसेंबर २०२२ साली विधानसभा निवडणूक नियोजित आहे. त्याआधीच विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यामुळे आता गुजरात भाजपामध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणूक नव्या चेहऱ्यासह लढण्याची तयारी भाजपाकडून केली जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आम आदमी पक्ष देखील गुजरातमध्ये भाजपाला टक्कर देत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पक्षात मोठे फेरबदल केले जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यात विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.