gujarat angry wife beaten husband with pestle for mosquito bite | खरंच की काय? डास चावला अन् बायकोनं नवऱ्याला धू धू धुतला!

खरंच की काय? डास चावला अन् बायकोनं नवऱ्याला धू धू धुतला!

ठळक मुद्देडास चावले म्हणून संतापलेल्या पत्नीने पतीलाच मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये ही विचित्र घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

अहमदाबाद - पती-पत्नीमध्ये काही कौटुंबिक कारणांवरून वाद झाल्याच्या घटना या सातत्याने समोर येत असतात. पण त्यातील काही भांडणं ही काही वेळेस विकोपाला ही जातात. अशीच एक अजब घटना अहमदाबादमध्ये घडली आहे. डास चावले म्हणून संतापलेल्या पत्नीने पतीलाच मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये ही विचित्र घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील नरोदा परिसरात हे दांपत्य राहतं. बुधवारी (13 नोव्हेंबर) डास चावले म्हणून रागावलेल्या पत्नीने आपल्या पतीला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत पती जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरामध्ये डास येतात आणि ते चावतात यामुळे पत्नीने कपडे धुण्याच्या धोपाटण्याने पतीला मारलं आहे. यामध्ये पतीला सात टाके पडले आहेत. पत्नीसोबत मुलीने देखील धोपाटण्याने वडिलांना मारहाण केली आहे.

पतीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो एक छोटासा व्यवसाय करतो. त्यामुळे महिन्याला फार कमी पैसे कमावतो. पैसे नसल्याने दोन महिन्यांचं वीजेचं बील भरलं गेलेलं नाही. त्यामुळे घरातील वीजप्रवाह हा खंडित करण्यात आलेला आहे. मंगळवारी रात्री पत्नी आणि आणि मुलगी झोपली होती. त्याच दरम्यान त्यांना डास चावले. दुसऱ्या दिवशी उठल्यावर घरातील पंखा बंद असल्यामुळे खूप डास चावल्याची तक्रार पत्नीने पतीकडे केली. मात्र त्याने त्यावेळी तिची गंमत केली.

डास चावल्यामुळे पत्नी आणि मुलीने रागाच्या भरात कपडे धुण्याच्या धोपाटण्याने मारायला सुरुवात केली. घरात सुरू असलेला गोंधळ ऐकून शेजारी घरात आले. पतीने शेजारी राहणाऱ्या आपल्या भावाला बोलावलं. शेजारांच्या मदतीने पत्नीच्या तावडीतून पतीची सुटका करण्यात आली. मात्र या मारहाणीत जखमी झाल्याने तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुखापतीमुळे सात टाके पडल्याची माहिती पतीने पोलिसांना दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी पत्नीसाठी गिफ्ट न आणणं एका पतीला चांगलंच महागात पडलं होतं. करवा चौथला पत्नीने सोन्याची नथ आणायला सांगितली होती. मात्र फक्त साडी घेऊन पती पोहचल्याने तिचा पारा चांगलाच चढला. गिफ्ट न आणल्याने रागाच्या भरात पतीला पळवून पळवून मारल्याची घटना समोर आली होती. गाझियाबादमध्ये हे दाम्पत्य राहतं. करवा चौथच्या निमित्ताने पत्नीने पतीला गिफ्ट म्हणून सोन्याची नथ आणायला सांगितली होती. मात्र पती फक्त नवीन साडी घेऊनच घरी आला. यामुळे पत्नी नाराज झाली आणि त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. पुढे हा वाद टोकाला गेला. संतापलेल्या पत्नीने पतीला काठीने मारायला सुरुवात केली. त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र पत्नीने त्याचे काहीही ऐकून घेतलं नाही. 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: gujarat angry wife beaten husband with pestle for mosquito bite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.