महात्मा गांधी भारतरत्न वा अन्य किताबांपेक्षा खूप मोठे - सर्वोच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 05:28 IST2020-01-18T05:28:26+5:302020-01-18T05:28:44+5:30
मात्र सरकारला आम्ही निर्देश देऊ शकत नाही

महात्मा गांधी भारतरत्न वा अन्य किताबांपेक्षा खूप मोठे - सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी हे भारतरत्न वा अन्य कोणत्याही किताबापेक्षा खूप मोठे आहेत. त्यांना अशा कोणत्याही औपचारिक मान्यतेची आवश्यकता नाही, असे सांगून गांधीजींना भारतरत्न किताब देण्यास केंद्र सरकारला आदेश द्यावेत, ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.
महात्मा गांधी हे सर्वांसाठी राष्ट्रपिता आहेत आणि सर्वांना त्यांच्याविषयी कमालीचा आदर आहे. भारतरत्न वा अन्य कोणत्याही औपचारिक किताब वा पुरस्कारापेक्षा त्यांची उंची खूपच मोठी आहे. शिवाय त्यांना भारतरत्न हा किताब द्यावा, अशा सूचना आम्ही सरकारला देऊ शकत नाही, असे सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. भूषण गवई व न्या. सूर्य कांत यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
अनिल दत्त शर्मा यांनी महात्मा गांधी यांना भारतरत्न किताबाने भूषविण्यात यावे, अशी याचिका केली होती. ती सुनावणीला आली, तेव्हा सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले की, महात्मा गांधी यांना भारतरत्न देण्यासाठीच्या तुमच्या भावना आम्ही भावना समजू शकतो. महात्मा गांधी यांना भारतरत्न द्यावे, अशी विनंती तुम्ही केंद्र सरकारला करू शकता.