ग्रेट ! आवाजाच्या दुप्पट वेगाने 'तेजस' उडणार; स्वदेशी विमान निर्मितीला चालना मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 06:32 PM2021-01-15T18:32:46+5:302021-01-15T18:33:50+5:30

तेजस या हलक्या लढाऊ विमानाची भारतीय हवाई दलाला अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती..

Great! 'Tejas' will fly at twice the speed of sound; Indigenous aircraft production will get a boost | ग्रेट ! आवाजाच्या दुप्पट वेगाने 'तेजस' उडणार; स्वदेशी विमान निर्मितीला चालना मिळणार

ग्रेट ! आवाजाच्या दुप्पट वेगाने 'तेजस' उडणार; स्वदेशी विमान निर्मितीला चालना मिळणार

googlenewsNext
ठळक मुद्दे८३ विमानांच्या खरेदीला मंजुरी : ४५ हजार ६९६ कोटी लागणार

निनाद देशमुख-    
पुणे : भारतीय हवाई दलासाठी ८३ तेजस खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने बुधवारी मंजुरी दिली. राफेल पाठोपाठ हवाई दलात तेजस विमाने दाखल होणार असल्याने हवाई दलाच्या ताकदीत आणखी वाढ  होणार आहे. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर या खरेदीच्या मंजुरीला महत्त्व आहे. हवाई ताकद वाढण्याबरोबरच स्वदेशी विमान तंज्ञनाला येत्या काळात चालना मिळणार असून, देशाच्या आत्मनिर्भर योजनेला यामुळे मोठे बळ मिळणारा आहे. आवाजाच्या दुप्पट वेगाने उडण्याची क्षमता तेजस मध्ये आहे.

बहुप्रतीक्षित तेजस या हलक्या लढाऊ विमानाची भारतीय हवाई दलाला अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. गेल्या ३० वर्षांपासून तेजस विमानावर संशोधन सुरू होते. मिग विमानांचे सातत्याने अपघात होत असल्याने तसेच १९९० नंतर ही विमाने सेवेतून निवृत्त होण्याच्या शक्‍यतेमुळे त्यांची जागा घेण्यासाठी भारतीय हवाई दलात नव्या हलक्‍या लढाऊ विमानांची गरज निर्माण झाली होती. या सोबतच परकीय अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताने हे विमान तयार करण्याचा निर्णय घेतला होता.

सुरुवातीच्या टप्प्यात विमान निर्मितीसाठी ५६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानंतर हा खर्च वाढत गेला. १९९३ मध्ये सरकारने या प्रकल्पासाठी २ हजार १८८ कोटी मंजूर केल्यानंतर विमान निर्मितीला वेग आला.
तेजस विमानांचे फायनल ऑपरेशनल क्लिअरन्स (उड्डाणाचा अंतिम परवाना) २०१९ ला एअरो इंडिया या विमानांच्या प्रदर्शनात मिळाला होता. या परवान्याचा अर्थ हवाई दलाला गरजेच्या असलेल्या सर्व तांत्रिक पूर्तता या विमानात पूर्ण झाल्या असून ते उड्डाणास योग्य असल्याचा हवाला त्रयस्थ यंत्रणेने दिला होता.  

दोन्ही प्रकारे करते मारा
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने बनवलेले तेजस हे पहिले भारतीय लढाऊ विमान ठरेल. हे विमान ४२ टक्के कार्बन फायबर, ४३ टक्के ॲल्युमिनियम आणि टिटॅनियम या धातूपासून बनविलेले आहे. तेजस विमान हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्रांचा मारा करू शकते. विमानात जहाजविरोधी क्षेपणास्त्र, बॉम्ब आणि रॉकेटसह अत्याधुनिक उपकरणे डागण्यास सक्षम आहे.
रिकाम्या विमानाचे वजन ५६८० किलो असून ९ हजार किलोचे वजन वाहून नेऊ शकते.  कमी उंचीवरून शत्रूच्या तळांचा अचूक भेद करण्याची क्षमता तेजसमध्ये आहे. ध्वनीच्या वेगाच्या दुप्पट वेगाने उडणाऱ्या तेजसची लांबी १३.२ मीटर आणि उंची ४.४ मीटर आहे.  
तेजस मिग २१ विमानांपेक्षाही आधुनिक असून हे चौथ्या पिढीचे विमान आहे.

इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड ॲरे (एईएसए), दृष्टीपलीकडील पल्ल्याचे क्षेपणास्त्र (बीव्हीआर), इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्रज्ञानयुक्त तसेच इस्राईल निर्मित आधुनिक रडार. हवेत इंधन भरण्याची सुविधा ८३ विमाने असणारे  मार्क १ ए प्रकारची, भविष्यातील मार्क २ विमानांवरही संशोधन सुरू

Web Title: Great! 'Tejas' will fly at twice the speed of sound; Indigenous aircraft production will get a boost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.