आजीबाईंनी राहुल गांधींना घरी बोलावले, पण दारात पोहोचताच घडलं असं काही, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 13:48 IST2025-01-10T13:48:38+5:302025-01-10T13:48:58+5:30
Rahul Gandhi News: राहुल गांधी हे नुकतेच दिल्लीतील एका ठिकाणी गेले असताना त्यांना एका आजीबाईंनी घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्या निमंत्रणाचा स्वीकार करत राहुल गांधी हे त्या आजींच्या घरी पोहोचले तेव्हा जे काही घडलं त्याची आता एकच चर्चा सुरू आहे.

आजीबाईंनी राहुल गांधींना घरी बोलावले, पण दारात पोहोचताच घडलं असं काही, त्यानंतर...
लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आपल्या दौऱ्यांदरम्यान, सातत्याने सर्वसामान्यांच्या भेटीगाठी घेत असतात. त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करतात. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत बोलण्यासाठी सर्वसामान्य लोक खूप उत्सुक असल्याचं दिसून येतं. राहुल गांधी हे नुकतेच दिल्लीतील एका ठिकाणी गेले असताना त्यांना एका आजीबाईंनी घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्या निमंत्रणाचा स्वीकार करत राहुल गांधी हे त्या आजींच्या घरी पोहोचले तेव्हा जे काही घडलं त्याची आता एकच चर्चा सुरू आहे.
त्याचं झालं असं की, राहुल गांधी यांनी हल्लीच दिल्लीतील एका केवेंटर्स स्टोअरला भेट दिली. यावेळी एका आजीबाईंनी त्यांना आपल्या घरी येऊन जाण्याची विनंती केली. या विनंतीचा मान राखत राहुल गांधी यांनी मी केवळ दोन मिनिटे घरी थांबेन असं सांगत निमंत्रणाचा स्वीकार केला. तसेच राहुल गांधी त्या आजीबाईंच्या घरी पोहोचले. मात्र राहुल गांधी हे जेव्हा त्या आजींच्या घरी आले तेव्हा आपल्या घराची चावी हरवली असल्याचं आजीबाईंच्या लक्षात आलं. त्यांनी चाचपून पाहिलं, पण त्यांच्याकडे घराची चावी नव्हती. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच हसू आवरता आलं नाही.
दरम्यान, राहुल गांधी यांनी या स्टोअरला भेट दिल्यावर तिथे आलेल्या ग्राहकांसोबत चर्चा केली. तसेच कोल्ड कॉफीसुद्धा तयार केली. राहुल गांधी यांनी केवेंटर्सच्या सहसंस्थापकांकडून त्यांचा व्यवसाय, त्यांच्यासमोरील आव्हानं आणि भविष्यातील योजनांबाबत चर्चा केली. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. याबाबत केलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधी लिहितात की, एका जुन्या कंपनीला नवी पिढी आणि नव्या बाजारासाठी कशा प्रकारे तयार केलं जाऊ शकतं? याबाबत केवेंटर्सच्या युवा संस्थापकांनी हल्लीच मला याबाबत काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या. केवेंटर्ससारख्या कंपन्या आमच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. आपण यांना पाठिंबा देऊन प्रोत्साहन दिलं पाहिजे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.