काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळेच महाआघाडी सत्तेपासून वंचित; भाजपाशी थेट लढतीतही दारुण अपयश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 07:08 IST2020-11-12T00:38:39+5:302020-11-12T07:08:35+5:30
काँग्रेस नेते अविनाश पांडे हे फक्त सहायकाच्या भूमिकेत दिसले.

काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळेच महाआघाडी सत्तेपासून वंचित; भाजपाशी थेट लढतीतही दारुण अपयश
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) नेतृत्वाखालील महाआघाडीतल्या काँग्रेस पक्षाने सर्वात खराब कामगिरी केली आहे. त्यामुळेच महाआघाडीला सत्ता मिळू शकलेली नाही. काँग्रेसने लढविलेल्या ७० जागांपैकी फक्त १९ जागांवर या पक्षाला विजय मिळाला.
काँग्रेसची ७० पैकी ३७ जागांवर भाजपशी थेट लढत झाली. त्यातील फक्त ७ जागा काँग्रेसला जिंकता आल्या. जनता दल (यू.) पक्षाच्या उमेदवारांविरोधात काँग्रेसने १० जागा जिंकल्या. बिहारमध्ये लढविलेल्या जागांपैकी काँग्रेसला ५१ जागांवर पराभव पत्करावा लागला.
बिहार निवडणुकीच्या काँग्रेस रणनीतीची सारी सूत्रे रणदीप सुरजेवाला यांच्या हाती सोपविण्यात आली होती.
काँग्रेस नेते अविनाश पांडे हे फक्त सहायकाच्या भूमिकेत दिसले. हमखास हरतील असे उमेदवार काँग्रेसने वीस जागांवर उभे केले होते असा आरोप त्या पक्षाच्या काही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केला. २४३ सदस्य संख्या असलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकांत एनडीएने १२५ जागांवर जिंकल्या असून त्यांना निसटते बहुमत मिळाले.
निवडणुका पूर्वतयारी फक्त दोन महिने आधी?
बिहारच्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने एक वर्ष आधीपासून पूर्वतयारी करणे अपेक्षित होते; पण त्या दिशेने पक्षाने निवडणुकांच्या दोन महिने आधी हालचाली केल्या, असा आरोपही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केला आहे.