सरकारची वाटचाल योग्य दिशेने; CAA, कलम 370 वरून टीका करणाऱ्यांना मोदींचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 10:01 IST2020-03-07T09:59:39+5:302020-03-07T10:01:09+5:30
विकास करत कामकाज करणे हा सरकारचा दृढ निश्चय आहे. सध्याच्या स्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी दृढ प्रतिज्ञा केली असल्याचे सांगत मोदींनी सरकारच्या निर्णयांचे कौतुक केले.

सरकारची वाटचाल योग्य दिशेने; CAA, कलम 370 वरून टीका करणाऱ्यांना मोदींचे प्रत्युत्तर
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी सरकारच्या नागरिकता संशोधन कायदा आणि जम्मू काश्मीरचा काढण्यात आलेल्या विशेष दर्जाच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. योग्य दिशेने जात असलेल्यांवर आज 'खरं बोलणारे' टीका करतात असा खोचक टोला मोदींनी विरोधकांना लगावला. एका कार्यक्रमात ते बोलत होते.
जगभरातील स्थलांतरीतांच्या अधिकाराच्या गोष्टी करणारी गँग आता शेजारील देशातील अल्पसंख्यांकाना नागरिकता देण्याच्या भारताच्या निर्णयाचा विरोध करत आहेत. ही गँग संविधानाची गोष्ट करते. मात्र जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविणे आणि भारतीय संविधान पूर्णपणे अंमलात आणण्यास विरोध करते. योग्य कृतीवर बोलणे चूक नाही. मात्र या लोकांमध्ये सरकारविषयी राग आहे. देशातील सध्याची स्थिती बदलण्यासाठी केलेल्या प्रयत्नात देखील त्यांना गडबड दिसते, असंही मोदींनी सांगितले.
दरम्यान विकास करत कामकाज करणे हा सरकारचा दृढ निश्चय आहे. सध्याच्या स्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी दृढ प्रतिज्ञा केली असल्याचे सांगत मोदींनी सरकारच्या निर्णयांचे कौतुक केले. आता अनुदान लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात येते. त्यामुळे हजारो कोटींची बचत झाली. त्याचप्रमाणे रेरा कायद्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला वाचविण्यास मदत झाली असून देश सतत पुढे जात असल्याचे मोदींनी सांगितले.