वैज्ञानिक महोत्सवाला सरकारचा असहकार खेदजनक; पश्चिम बंगालच्या राज्यपालांची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 12:46 IST2019-11-08T12:46:11+5:302019-11-08T12:46:52+5:30
महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीबाबत उत्सुक

वैज्ञानिक महोत्सवाला सरकारचा असहकार खेदजनक; पश्चिम बंगालच्या राज्यपालांची कबुली
सीमा महांगडे
कोलकाता - भारतीय आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक महोत्सव म्हणजे अनेक नवीन संशोधन आणि गोष्टीचा खजाना असताना पश्चिम बंगाल सरकारकडून भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाला बहिष्कृत करणे खेदजनक असल्याची प्रतिक्रिया पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांनी लोकमतला दिली. पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल धनकड यांनी राज्यभवनामध्ये आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांपैकी निवडक प्रसारमाध्यमांना भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
पाचव्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या आयोजनाचा चौथा दिवस असूनही आत्तापर्यंत त्याच्या आयोजकांमध्ये नसलेला ताळमेळ आणि पश्चिम बंगाल सरकारची महोत्सवाविषयी असलेली अनास्था चर्चेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर बंगाल हे परंपरागत शैक्षणिक संस्थांचे ठाणे असूनही सरकारची अनास्था खेदजनक असल्याचे मत राज्यपालांनी मांडले.
महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत उत्सुकता
पश्चिम बंगालचे राजकारण आणि त्यावर संवाद साधताना राज्यपाल धनकड यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात काय चालू आहे असे विचारत त्याबद्दल उत्सुकता दाखविली. मात्र त्यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली असता बंगालच्या बाहेर मी बंगालविषयी बोलत नाही आणि इतर राज्यांविषयी इथे बोलत नसल्याचे सांगत चुप्पी साधली. मात्र महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीसंदर्भात पश्चिम बंगालमध्येही उत्सुकता असल्याचे चित्र या निमित्ताने स्पष्ट झाले.