रामदेव बाबा म्हणतात, सरकारनं जेएनयूतल्या वयस्कर विद्यार्थ्यांना पेन्शन द्यावी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 06:46 PM2020-01-24T18:46:53+5:302020-01-24T18:50:40+5:30

जेएनयूमधल्या आंदोलनांवर रामदेव बाबांची खोचक टोला

Government Should Give Pension to Elderly JNU Students to Keep Quiet says Ramdev baba | रामदेव बाबा म्हणतात, सरकारनं जेएनयूतल्या वयस्कर विद्यार्थ्यांना पेन्शन द्यावी

रामदेव बाबा म्हणतात, सरकारनं जेएनयूतल्या वयस्कर विद्यार्थ्यांना पेन्शन द्यावी

googlenewsNext

नवी दिल्ली: योगगुरू रामदेव बाबांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात वारंवार होणाऱ्या आंदोलनांवर खोचक शब्दांत भाष्य केलं आहे. विद्यापीठात शिकणाऱ्या वयस्कर विद्यार्थ्यांना सरकारनं पेन्शन द्यावी. त्यामुळे ते विद्यापीठ परिसरात शांत राहतील, अशा शब्दांत रामदेव बाबांनी जेएनयूतल्या आंदोलनांवर उपरोधिक टीका केली. दिल्लीतल्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये बोलताना त्यांनी जेएनयूतल्या घडामोडींवर मार्मिक भाष्य केलं. 

आंदोलनं करण्याचं काम राजकीय पक्षांना करू द्या. तुम्ही वर्गात जाऊन अभ्यास करा, असा सल्ला रामदेव बाबांनी विद्यार्थ्यांना दिला. जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी शुल्क वाढीविरोधात केलेल्या आंदोलनाची देशभरात चर्चा झाली होती. त्यावर आज रामदेव बाबांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) पूर्ण पाठिंबा असल्याचं म्हटलं. सीएएच्या विरोधात आंदोलनं करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

'काही राजकीय पक्ष, आंतरराष्ट्रीय शक्ती आणि काही जातीयवादी संघटना सीएएचा विषय तापवून अल्पसंख्याकांच्या मनात भीती निर्माण करत आहेत. स्वत:च्या स्वार्थासाठी काहींकडून देशातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सीएएच्या माध्यमातून कोणाचंही नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही,' असं रामदेव बाबा म्हणाले. आंदोलकांनी हिंसाचार करू नये, असं आवाहन त्यांनी केलं. 

कोणताही नेता किंवा राजकीय पक्ष कोणत्याही व्यक्तीचं नागरिकत्व काढून घेऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये. लोकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनं करुन सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करू नये. कोणत्याही कट्टरतावादी संघटनेच्या अपप्रचाराला लोकांनी भुलू नये, असंदेखील ते म्हणाले. 
 

Web Title: Government Should Give Pension to Elderly JNU Students to Keep Quiet says Ramdev baba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.