संसदेत सरकारची पुन्हा एकदा नाचक्की
By Admin | Updated: March 13, 2015 23:11 IST2015-03-13T23:11:10+5:302015-03-13T23:11:10+5:30
संसदेत सरकारची पुन्हा एकदा नाचक्की झाली. वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीवर आक्षेप घेत एकजूट झालेल्या विरोधकांनी

संसदेत सरकारची पुन्हा एकदा नाचक्की
नवी दिल्ली : संसदेत सरकारची पुन्हा एकदा नाचक्की झाली. वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीवर आक्षेप घेत एकजूट झालेल्या विरोधकांनी शुक्रवारी लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्पावर चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आणि सरकारला विरोधकांपुढे नतमस्तक होऊन ही चर्चा सोमवारपर्यंत स्थगित करावी लागली.
याआधी मंगळवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर विरोधकांनी भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाबाबतची आपली एक दुरुस्ती पारित करवून घेत सरकारची नाचक्की केली होती. लोकसभेत शुक्रवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर सर्वसाधारण अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होणार होती; परंतु जेटली विदेशात असल्याकारणाने त्यांच्या गैरहजेरीत अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेण्यास विरोधकांनी स्पष्ट नकार दिला आणि ही चर्चा सोमवारपर्यंत पुढे ढकलण्याची मागणी केली.
विरोधी पक्ष आपल्या मागणीवर ठाम असल्याचे पाहून संसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ‘जेटली हे ब्रिटन सरकारच्या निमंत्रणावरून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी लंडनला गेले आहेत. वित्तमंत्र्यांच्या गैरहजेरीत चर्चेत भाग घेण्याची काँग्रेसची इच्छा नसेल तर जे तयार आहेत, त्यांना या चर्चेत भाग घेण्याची परवानगी दिली जावी आणि वित्तमंत्री आल्यानंतर काँग्रेस या चर्चेत भाग घेऊ शकेल.’ सभागृहातील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नायडूंची ही सूचना फेटाळली. ते म्हणाले, ‘आता मात्र हद्दच झाली आहे. हे लोकशाहीची हत्या करण्यासारखे आहे.’
तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनीही नायडूंच्या सूचनेवर तीव्र आक्षेप घेतला. सभागृहात काँग्रेस हा मुख्य विरोधी पक्ष आहे आणि या पक्षाशिवाय चर्चा करणे अनुचित आहे. चर्चेची सुरुवात काँग्रेसकडूनच झाली पाहिजे, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)