Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 18:18 IST2025-08-04T18:17:13+5:302025-08-04T18:18:47+5:30
रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलेल्या काही तरुणांनी व्हेज बिर्याणीत हाड असल्याचा आरोप करून गोंधळ घातला.

Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलेल्या काही तरुणांनी व्हेज बिर्याणीत हाड असल्याचा आरोप करून गोंधळ घातला. पण सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर या तरुणांचा खोटारडेपणा पकडला गेला, ज्यामध्ये ते स्वतः बिर्याणीत हाड घालताना दिसत आहे.
गोरखपूरच्या कँट पोलीस स्टेशन परिसरातील शास्त्री चौकातील 'बिर्याणी बे' रेस्टॉरंट आहे. ३१ जुलै रोजी रात्री ९ वाजता ८ ते १० जणांचा ग्रुप या रेस्टॉरंटमध्ये बिर्याणी खाण्यासाठी आला. ग्रुपमधील काही तरुणांनी नॉनव्हेज बिर्याणी ऑर्डर केली आणि बाकीच्यांनी व्हेज बिर्याणी ऑर्डर केली. जेवल्यानंतर काही वेळातच एका तरुणाने व्हेज बिर्याणीत हाड असल्याचा आरोप केला.
श्रावण महिन्यात व्हेज बिर्याणीत हाड मिळाल्याचा आरोप करून तरुणाने गोंधळ घालायला सुरुवात केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कसंबसं सर्व तरुणांना रेस्टॉरंटमधून बाहेर काढलं. याच दरम्यान रेस्टॉरंट मालकाने ५ ते ६ हजारांचं बिल तरुणांनी न भरल्याची तक्रार केली. कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा संपूर्ण सत्य समोर आलं.
सावन के महीने मे ये लोग इतना घटिया पाप कर रहे है कि गंगा नदी मे भी इनके पाप ना धुले ,
— Nargis Bano (@Nargis_Bano78) August 4, 2025
गोरखपुर मे लड़को ने जानबूझकर वेज बिरयानी मे हड्डी डाल दी ताकि बिल देना ना पड़े , लेकिन ऊपर वाला सब देख रहा है ,
ऐसे घटिया लोगो के खिलाफ सख्त कार्यवाही हो, pic.twitter.com/bTyLPejoGD
सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत होतं की, एक तरुण मध्यभागी बसलेल्या तरुणाला हाड देतो. जे नंतर व्हेज बिर्याणी खाणाऱ्या मित्राच्या प्लेटमध्ये ठेवलं जातं. असा आरोप आहे की, जेवणाचं बिल ५-६ हजार रुपये झालं होतं पण ते पैसे देऊ इच्छित नव्हते, त्यामुळे त्यांनी हे कृत्य केलं.
या प्रकरणावर रेस्टॉरंटचे मालक रविकर सिंह म्हणाले की, त्यांच्याकडे व्हेज, नॉनव्हेज हे वेगळं बनवलं जातं. त्यामुळे कधीच कोणाच्या प्लेटमध्ये हाड गेलं नाही, फक्त यांच्याच प्लेटमध्ये हाड कसं जाऊ शकतं? बिल जास्त आलं आहे, म्हणूनच तरुणांनी गोंधळ घातला आहे. गेल्या १५ वर्षांपासून रेस्टॉरंट व्यवसायाशी संबंधित असल्याने कोणाच्याही भावना दुखावण्याचं काम ते करत नाहीत.
पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यांनी सर्व मुलांना रेस्टॉरंट बाहेर हाकलून लावलं. या प्रकाराचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तरुण नॉनव्हेज बिर्याणीमधून हाड काढून ते व्हेज बिर्याणीमध्ये ठेवताना दिसत आहेत.