बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 05:57 IST2025-07-14T05:57:41+5:302025-07-14T05:57:50+5:30
राजधानी पाटणा शहरानजीक शनिवारी रात्री एका ग्रामीण आरोग्य अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली.

बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
पाटणा : बिहारची राजधानी पाटणा शहरासह संपूर्ण राज्यात गुंडाराजसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलै महिना सुरू झाल्यापासून रविवारपर्यंत या राज्यात ३० पेक्षा अधिक लोकांच्या हत्या झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राजधानी पाटणा शहरानजीक शनिवारी रात्री एका ग्रामीण आरोग्य अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली.
पाटणा शहरानजीकच्या पिपरा क्षेत्रातील शेखपुरा गावालगतच्या शेतात ५० वर्षीय आरोग्य अधिकारी सुरेंद्र कुमार यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळया झाडून हत्या केली. ग्रामस्थांनी गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर ते शेतात दाखल झाले. त्यानंतर ग्रामस्थांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुमार यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काँग्रेसची टीका
बिहार व पाटणा शहरातील गोळीबार व हत्येचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसने राज्यातील जदयू-भाजपच्या सरकारला लक्ष्य केले आहे. काँग्रेसने एक्स सोशल मीडियावर रविवारी एक पोस्टर शेअर करत जुलै महिन्यात कोणत्या तारखेला कुठल्या शहरात किती लोकांची हत्या झाली, त्यासंदर्भात सविस्तर आकडेवारी दिली. त्यामुळे राज्यातील गोळीबार व हत्या प्रकरणाचे गांभिर्य जास्तच वाढले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यातील गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित करत बिहार सरकारविरोधात पोस्टर वार सुरू केले आहे.